26 November 2020

News Flash

विशालवर ‘सिक्का’!

समूहातील पुनरागमनाची किंमत डझनभर बडय़ा अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने मोजावी लागणाऱ्या संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी अखेर गुरुवारी आपले पुत्र रोहनसह इन्फोसिसमधून बाहेर...

| June 13, 2014 12:16 pm

समूहातील पुनरागमनाची किंमत डझनभर बडय़ा अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने मोजावी लागणाऱ्या संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी अखेर गुरुवारी आपले पुत्र रोहनसह इन्फोसिसमधून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबिला. असे करताना त्यांनी प्रथमच समूहाबाहेरील पन्नाशीच्या आतील डॉक्टरेट व्यक्तीच्या हाती देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीची नस सोपविली.
भारताच्या ११० अब्ज डॉलरच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व न्यू यॉर्कच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विशाल सिक्का यांची नियुक्ती करत असल्याचे मूर्ती यांनी गुरुवारी मुंबई शेअर बाजाराला सूचित केले. त्याचबरोबर पुत्र रोहन व आपण कंपनीतील कार्यालय सोडत असल्याचे जाहीर केले.
सॅप या जर्मन सॉफ्टवेअर कंपनीच्या कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य राहिलेले ४७ वर्षीय विशाल सिक्का हे इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे १ ऑगस्ट रोजी घेतील. कंपनीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संस्थापक एस. डी. शिबुलाल हे जानेवारीत निवृत्त होणार आहेत. मूर्ती पिता-पुत्रांचा कालावधी हा पाच वर्षांसाठी होता.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात इन्फोसिस आपल्या पुढील टीसीएस व मागील विप्रोशी कट्टर स्पर्धा करते. मूर्ती यांनी ८० च्या दशकात महाराष्ट्रातील पुण्यात कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी त्यांच्याबरोबर सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. शिबुलाल व कार्यकारी उपाध्यक्ष एस. गोपालकृष्णन आदी मिळून सात जण होते.
इन्फोसिसमधील कर्मचारी गळतीचे प्रमाण मार्च २०१४ अखेर तब्बल १८.७ टक्क्यांवर गेले होते. वर्षभरात ते २.४ टक्क्यांनी वाढले. निवृत्तीनंतर मूर्ती यांनी कंपनीत जून २०१३ मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रवेश केल्यानंतर कंपनीतील १.६० लाख कर्मचाऱ्यांपैकी एक पंचमांश कर्मचारी बाहेर पडले होते. यामध्ये मूर्ती यांच्या सहयोगी संस्थापकांसह अनेक बडय़ा पदावरील व्यक्तीही होत्या. गेली सलग चार वर्षे महसुलातील घसरण नोंदविणाऱ्या इन्फोसिसध्ये परत येताना मूर्ती यांनी आपले पुत्र रोहन यांना त्यांचे कार्यकारी सहयोगी म्हणून पुढे केले होते.
मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या इन्फोसिसच्या संचालक मंडळावर बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यादेखील एक संचालक आहेत. इन्फोसिसचे तरुण संचालक रोहन मूर्ती यांच्या सादरीकरणाने प्रभावित होत त्यांनी संचालक मंडळाच्या एका बैठकीनंतर रोहन यांच्याबद्दलचे कौतुगोद्गार ‘ट्विट’ केले होते. यानंतर आपले हे मत मागे घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मूर्ती यांच्याबरोबर इन्फोसिसचे कार्यकारी उपाध्यक्ष एस. गोपालकृष्णन हेही येत्या शनिवारी पायउतार होणार आहेत. मूर्ती ११ ऑक्टोबरपासून कंपनीचे मानद अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील, तर आयसीआयसीआय बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. कामथ हेदेखील तेव्हापासूनच इन्फोसिसचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष बनतील. १४ जून रोजी कंपनीच्या वार्षिक भागधारकांच्या बैठकीत या सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब होणार आहे.
सिक्का यांच्या नियुक्तीबद्दल आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान उद्योग स्तरावर कौतुकोत्सव साजरा होत आहे.
सिक्का यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाबरोबर व्यवस्थापकीय संचालकपदही येणार आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या स्पर्धेतील समूहातील एक अधिकारी, अध्यक्ष यू. बी. प्रवीण राव यांना यापूर्वीच मुख्य कार्यचलन अधिकारी म्हणून बढती देण्यात आली आहे. कंपनीचे पूर्णवेळ संचालक श्रीनाथ बटनी हेही ३१ जुलै रोजी पायउतार होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2014 12:16 pm

Web Title: former sap executive vishal sikka to be first non founder ceo of infosys
Next Stories
1 सेन्सेक्सची शतकी भर
2 अर्थव्यवस्था सुधारतेय..
3 नजर व्याजदरावर
Just Now!
X