एमसीएक्स स्टॉक एक्स्चेन्जला परवानगी देताना नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय अन्वेषण विभागाने सेबीचे तत्कालिन अध्यक्ष सी. बी. भावे यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी नोंदविली आहे.
विभागाने सी. बी. भावे यांच्यासह सेबीचे माजी सदस्य के. एम. अब्राहम यांच्याविरुद्धही कारवाई केली आहे. जिग्नेश शहा प्रवर्तित एमसीएक्स स्टॉक एक्स्चेन्जबाबत कारवाई करतानाच विभागाने शहा यांच्याविरुद्धही तक्रार दाखल केली आहे. एमसीएक्स स्टॉक एक्स्चेन्जला सेबीने २००८ मध्ये मान्यता देताना नियमांचे पालन केले नाही, असे याबाबतच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर याबाबतचा प्रस्ताव पुढील दोन्ही वर्षीदेखील नियम बाजुला ठेवून हाताळला गेला, असाही ठपका ठेवण्यात आला आहे.
भावे हे सेबीचे अध्यक्ष असताना त्यांच्याच संचालक मंडळातील काही सदस्यांनी याबाबतच्या प्रस्तावाला विरोध केल्यानंतरही नव्या भांडवली बाजाराला परवानगी कशी मिळाली, असे आश्चर्यही केंद्रीय अन्वेषण विभागाने व्यक्त केले आहे. एमसीएक्स स्टॉक एक्स्चेन्ज हे भावे अध्यक्ष पदावरून दूर झाल्यानंतर अस्तित्वात आले. भावे यांच्या कारकिर्दीत ते स्थापनेसाठी प्रदिर्घ काळ संघर्ष करत होते.