कर्जभारीमांजराच्या गळ्यात तिसऱ्यानेच बांधली घंटा; आयआयएच हेल्थकेअरचा ४ हजार कोटींचा व्यवहार; दोन महिन्यात आणखी २६ टक्के हिस्सा वाढविणार

प्रवर्तकांनी निधी अन्यत्र वळविल्यानंतर फुगलेल्या कर्जाचा सामना करावे लागणाऱ्या फोर्टिस हेल्थकेअरला अखेर खरेदीकरिता तारणहार मिळाला आहे. बोलीनिहाय प्रक्रियेत भिन्न उत्सुक खरेदीदाराला यापूर्वी प्रतिसाद देणाऱ्या फोर्टिसच्या संचालक मंडळाने यंदा तिसऱ्याच बोलीधारकाला प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला आहे.

फोर्टिस हेल्थकेअरमध्ये ३१.१० टक्के हिस्सा ४,००० कोटी रुपयांना खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. परिणामी, ८,८८० कोटी रुपयांची आरोग्यनिगा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ताब्याबाबतची गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया संपुष्टात येत आहे.

देशातील दुसरा मोठा आरोग्य सुविधा क्षेत्रातील समूह असलेल्या फोर्टिसचे प्रवर्तक सिंग बंधू यांनी कंपनीतील रक्कम अन्यत्र वापरल्यामुळे कर्जभार वाढत गेला. परिणामी त्याच्या विक्रीची प्रक्रिया राबविण्यात येत होती. याकरिता मणिपाल हेल्थ एंटरप्राईजेस व टीपीजी, मुंजाल-बर्मन कुटुंबिय तसेच मलेशियाची आयएचएच हेल्थकेअरने बोली लावली होती. फोर्टिजने सर्वप्रथम मणिपालची तर नंतर मुंजाल-बर्मनची निविदा मान्य केली होती. मात्र तिसऱ्यांदा झालेल्या प्रक्रियेत मलेशियन कंपनीची बोलीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

फोर्टिस-आयएचएचचा व्यवहार भारतीय स्पर्धा आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडय़ाभरात पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील ६० ते ७५ दिवसात यासाठी भागधारकांची परवानगी घेणे आवश्यक ठरेल. प्राथमिक टप्प्यातील हिस्सा खरेदीनंतर आयएचएच समूह फोर्टिसमध्ये आणखी २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे.

मलेशियन आरोग्यनिगा कंपनीचा प्रति समभाग १७० रुपयांचा प्रस्ताव हा स्पर्धक मणिपाल-टीपीजीच्या प्रति समभाग १६० रुपयांपेक्षा अधिकचा होता. नव्या व्यवहारानंतर फोर्टिसच्या ताब्यातील रुग्णालय व्यवसायाची नाममुद्रा बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

फोर्टिसचे बाजारमूल्य वाढले

मलेशियन आरोग्यनिगा कंपनीच्या हिस्सा खरेदीमुळे भांडवली बाजारातील सूचिबद्ध फोर्टिस हेल्थकेअरचा समभाग शुक्रवारी ४ टक्क्य़ांनी उंचावला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य २९३.१३ कोटी रुपयांनी वाढून ७,६६६.१३ कोटी रुपयांवर पोहोचले. मुंबईच्या शेअर बाजारात कंपनी समभाग ३.९७ टक्के वाढीसह १४७.८० वर बंद झाला.

धोरणात्मक आणि आर्थिकदृष्टय़ा आयएचएचचा प्रस्ताव खूपच चांगला आहे. कंपनीला आता पुनरुज्जीवनाच्या मार्गावर आम्ही नेत आहोत. कंपनीची वाढ आणि भागीदारी यापुढेही कायम राहिल.   रवि राजागोपाल, अध्यक्ष, फोर्टिस हेल्थकेअर.

फोर्टिस हेल्थकेअरसाठी आवश्यकता भासली तर आयएचएच समूह आणखी काही गुंतवणूक करेल. या व्यवहारासाठी एकूण ६,००० कोटी रुपयांची रक्कम लागणार असल्याचा आमचा अंदाज आहे. टॅन सी लेंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएचएच.