आर्थिक ताळेबंदातील अनियमिततेची कबुली देणाऱ्या सीजी पॉवर अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्सचे संस्थापक गौतम थापर यांची अखेर कंपनीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली आहे. गैरव्यवहाराचे आरोप धुडकावूनही थापर यांना बाजूला सारण्याचा प्रस्ताव कंपनीच्या मुख्याधिकाऱ्यांना अन्य संचालकांच्या भूमिकेच्या दबावात मंजूर करून घ्यावा लागला.

कंपनीच्या संचालक मंडळाच्या अधिकाधिक सदस्यांनी या हकालपट्टी प्रस्तावाला मंजुरी दिली. या बैठकीत स्वत: थापर हेही उपस्थित होते. आपण कोणताही गैरव्यवहार तसेच अनियमितता केली नसल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. मात्र सदस्यांच्या आग्रहापुढे मुख्याधिकारी के. एन. नीलकांत यांना संबंधित प्रस्ताव ठेवत तो मंजूर करून घ्यावा लागला.

संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २० ऑगस्ट रोजी कंपनीतील आर्थिक अनियमिततेचे प्रकरण समोर आले होते. आठवडय़ापूर्वी कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक ताळेबंदाची अंतर्गत चौकशी केली होती. कंपनीला बँकेने दिलेल्या कर्जाच्या रूपातील निधी अन्यत्र वळविण्यात आल्याची ही चौकशी होती.

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारीही होत असून, त्यात नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एका स्वतंत्र संचालकाला बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाण्याचीही अटकळ आहे.

कंपनीतील जवळपास १३ टक्के हिस्सेदारीमुळे खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या समभागालाही गेल्या काही दिवसांमध्ये भांडवली बाजारात मोठय़ा घसरगुंडीला सामोरे जावे लागले आहे. संस्थापक थापर यांच्याकडे या कंपनीचे आता केवळ ८,५७४ समभाग राहिले आहेत.