जागतिक अर्थसकारात्मकतेने सेन्सेक्सची मुसंडी
मोदी सरकारची द्विवर्षपूर्ती आणि बाजाराची महिन्यातील वायदापूर्ती एक दिवसावर येऊन ठेपली असताना बुधवारी गुंतवणूकदारांच्या नफेखोरीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या संभाव्य व्याज दरवाढीने गृहनिर्माण क्षेत्रात चैतन्य पसरण्याची आशा व्यक्त करत विदेशी गुंतवणूकदारांनी अवलंबिलेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने एकाच व्यवहारात तब्बल ५७६.७० अंश उसळी घेतली. गेल्या तीन महिन्यांच्या या निर्देशांकझेप जोरावर मुंबई निर्देशांकाला २५,८८१.१७ हा त्याचा गेल्या महिन्याभरातील सर्वोच्च टप्पाही गाठता आला. एकाच सत्रातील १८६.०५ अंशवाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही बुधवारी ७,९०० पल्याड, ७,९३४.९० पोहोचता आले.
मुंबई शेअर बाजाराने मंगळवारच्या किरकोळ वाढीसह यापूर्वीची गेल्या सलग चार व्यवहारांतील ५४९ अंश घसरणीला पायबंद घातला होता. कंपन्यांचे वाढत्या नफ्यातील घसरणीचे तिमाही निकाल आणि संभाव्य व्याज दरकपात यामुळे बाजारात गेल्या काही सत्रांपासून निराशा होती. बाजाराचा बुधवारचा प्रवासच तेजीसह झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स थेट ३०५ अंशांनी वाढत २५,६१० वर गेला.
परकी चलन विनिमय मंचावर गेल्या अडीच महिन्यांच्या तळात पोहोचलेले डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे मूल्यही बुधवारी उंचावलेले पाहून विदेशी गुंतवणूकदारांमध्ये अधिक उत्साह संचारला. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा प्रति पिंप ५० डॉलरपासून दूर जात असल्याची दखलही बाजाराने घेतली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सत्रात २५,८९७.८७ पर्यंत झेपावला, तर निफ्टीचा स्तर व्यवहारात ७,९५० नजीक पोहोचला. दिवसअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांक मंगळवारच्या तुलनेत तब्बल २ टक्क्यांहून अधिक वाढले होते. बंदअखेरचा सेन्सेक्सचा बुधवारचा स्तर हा त्याच्या महिन्याभरातील वरच्या टप्प्यावर होता, तर एकाच व्यवहारातील त्याची ५००हून अधिक अंशांची उसळी ही १ मार्चमधील झेपनंतरची सर्वात मोठी ठरली
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 26, 2016 9:27 am