बनावट कर्ज वितरण प्रकरणात आर्थिक निर्बंध असलेल्या पीएमसी बँकेच्या पुनर्बाधणीसाठी चार गुंतवणूकदार, कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे. त्याचबरोबर सहकारी बँकेवरील आर्थिक निर्बंध आता ३१ मार्च २०२१ पर्यंत विस्तारण्यात आले आहेत.

पीएमसी (पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी) बँकेच्या पुनर्बाधणी योजनेनुसार चार जणांनी स्वारस्य दाखविल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी स्पष्ट केले. याबाबत १५ डिसेंबरला, अखेरच्या दिवशी मध्यवर्ती बँकेकडे अर्ज प्राप्त झाले असून त्याच्या निवडीसाठी काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सहकारी बँकेवर असलेले आर्थिक निर्बंध येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत विस्तारण्यात आल्याचेही रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केले. यानुसार बँकेच्या खातेदार, ठेवीदारांना रक्कम काढण्यासाठीच्या मर्यादा आणखी तीन महिन्यांसाठी कायम राखण्यात आल्या आहेत.

सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध आणतानाच सप्टेंबर २०१९ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली. बँकेने वितरित केलेल्या ८,३८३ कोटी रुपयांच्या कर्जापैकी ७० टक्के कर्ज एचडीआयएल कंपनीला देण्यात आले होते. या प्रकरणात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटकही करण्यात आली होती.