महाराष्ट्रातील अस्तित्व अधिक विस्तारताना जर्मन कंपनी फोक्सव@गनची चाकण (पुणे) येथील प्रकल्पात अतिरिक्त २,००० कोटी रुपयांची रखडलेली गुंतवणूक मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतचा अधिकृत करार राज्य शासन व कंपनी दरम्यान येत्या आठवडय़ात होण्याचे संकेत राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळाले आहेत.
फोक्सव्ॉगनचा चाकण येथील ५७५ एकर जागेवर वाहन निर्मिती प्रकल्प आहे. कंपनीच्या येथे पोलो, व्हेन्टोसह स्कोडाच्या फॅबिया, रॅपिडसारख्या वाहनांची निर्मिती होते. वार्षिक १.३० लाख वाहन निर्मिती येथे होते. याशिवाय फोक्सव्ॉगनच्या जेट्टा आणि पॅसट या सेदान श्रेणीतील वाहनांची जुळवणी कंपनीच्या महाराष्ट्रातीलच औरंगाबाद येथील प्रकल्पात होते. येथे स्कोडा या जर्मन कंपनीच्याच ऑडी आणि स्कोडाच्या प्रिमियम क्षेणीतील वाहनांची जुळवणी होते.
कंपनीची नवी गुंतवणूक ही इंजिन निर्मिती सुविधा उपलब्ध करण्यासाठी असल्याचे सांगितले जाते. यासह कंपनीने २०१५ पर्यंत छोटय़ा कारच्या निर्मितीवर भर देण्याचे यापूर्वी जाहीर केलेल्या धोरणांतर्गतही हा विस्तार असेल, असेही समजते.
फोक्सव्ॉगनच्या म्हणण्यानुसार, कंपनीने २००९ मध्येही ३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यामुळे चाकण प्रकल्पाची वाहन निर्मिती क्षमता वार्षिक १.१ लाखांवरून २०११ पर्यंत १.३० लाख झाली. सध्या येथील वापर क्षमतेपैकी ८० टक्क्यांहून अधिक आहे. चाकण प्रकल्पात २०१२ मध्ये एकूण पोलो आणि व्हेन्टो कार उत्पादनापैकी दोन-तृतियांश उत्पादन तर स्कोडाच्या फॅबिया आणि रॅपिडचे एक-तृतियांश उत्पादन होते.