अलीकडच्या काही वर्षांत व्हेंटो आणि पोलो या कारच्या लोकप्रियतेने भारतीय बाजारपेठेत बस्तान बसविण्यात यशस्वी ठरलेल्या फोक्सव्ॉगन एजी या जर्मन समूहाने आपल्या सर्व मोटारींसाठी अधिकाधिक सुटे घटक भारतातूनच उत्पादित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयात होणारे घटक किमान स्तरावर आणून स्थानिक बाजारपेठेत किमतीच्या दृष्टीनेही अधिक स्पर्धाशील बनण्याचा कंपनीचा मानस आहे.
फोक्सव्ॉगन या जर्मन समूहाकडून भारतात तिची नाममुद्रा असलेल्या मोटारींव्यतिरिक्त स्कोडा, ऑडी, पोर्शे आणि लॅम्बॉर्गिनी या आलिशान श्रेणीतील मोटारींची विक्री आणि उत्पादन घेतले जाते. उल्लेखनीय म्हणजे फोक्सव्ॉगनचे औरंगाबाद आणि चाकण (पुणे) येथील भारतातील दोन उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रातच आहेत. चाकण प्रकल्पात पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेली ३८०० कोटी रुपयांची गुंतवणूक ही कोणत्याही जर्मन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. औरंगाबाद, पुणे आणि राष्ट्रीय विक्री मुख्यालय मुंबई असे तिन्ही ठिकाणी मिळून कंपनीचे जवळपास ५,००० कर्मचारी तिच्या सेवेत आहे. सध्याच्या घडीला या कंपनीने देशाच्या कार बाजारपेठेचा २.१ टक्केहिस्सा कमावण्यात यश मिळविले आहे. वाहन उद्योगासाठी अत्यंत खडतर गेलेल्या सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीला ५२,५२५ मोटारींची विक्री करता आली आहे.
सध्याच्या फोक्सव्ॉगनच्या मोटारींमध्ये ३० ते ३५ टक्के आयातीत घटक असून, हे प्रमाण जेमतेम १० टक्क्यांवर खाली येईल, असा आपला प्रयत्न असल्याचे फोक्सव्ॉगन इंडिया प्रा. लि.चे संचालक मायकल मायर यांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने इंजिन आणि गीअरबॉक्स या महत्त्वाच्या उपकरणांचे उत्पादन भारतातच झाल्यास, तयार होणाऱ्या कारच्या विक्री किमतीत सध्याच्या स्तरावरून मोठी कपात करणे शक्य होईल आणि त्यामुळे विविध कारच्या वर्गवारीत कंपनीच्या मॉडेल्सना तगडी स्पर्धा करता येईल, असा विश्वास मायर यांनी व्यक्त केला.