विकसित अमेरिकेपेक्षा आर्थिक संकटातून सावरत असलेल्या युरो झोनवर भारतीय गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित करणारा फंड फ्रँकलिन टेम्पल्टनने सादर केला आहे. खुल्या पद्धतीचा कंपनीच्या या फंडामार्फत युरोपातील विविध देशांमधील इंधन, ऊर्जा आदी क्षेत्रांत गुंतवणूक करण्याचा पर्याय यामार्फत उपलब्ध झाला आहे.
‘फ्रँकलिन इंडिया फिडर- फ्रँकलिन युरोपियन ग्रोथ फंड’ नावाच्या या फंडासाठी गुंतवणूक प्रक्रिया २५ एप्रिल ते ९ मे दरम्यान पार पडणार आहे. यासाठी प्रत्येकी १० रुपये युनिटद्वारे किमान ५,००० रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. फंडासाठी एमएससीआय युरोप निर्देशांक आधार असेल.
‘ब्राऊन’ रंग श्रेणी द्वारे या फंडाची (अधिक) जोखीम अधोरेखित करण्यात आली आहे. या योजनेसाठी १९ मे रोजी पुनर्खुली तसेच विक्री आणि पुनर्खरेदीचा पर्याय देण्यात आला आहे. जागतिक व्यासपीठावरील कंपनीचा हा चौथा गुंतवणूक फंड आहे. याद्वारे युरोप खंडातील विविध ऊर्जा, वित्त क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक होईल.  
अमेरिकन बाजारपेठेतील गुंतवणुकीवर आधारित यूएस अपॉच्र्युनिटी फंड सादर केल्यानंतर फ्रँकलिन टेम्पल्टनचा हा पहिलाच बाहेरच्या जगातील फंड आहे. यूएस अपॉच्र्युनिटी फंडअंतर्गत कंपनीची मालमत्ता मार्च २०१४ अखेर तिच्या सादरीकरणाच्या १०४ कोटी रुपयांवरून ७५८ कोटी रुपये झाली आहे.
तब्बल २८ देशांचे नेतृत्व करणाऱ्या युरोपातील अर्थव्यवस्था आता सावरली असून जागतिक स्तरावर अमेरिका खंडापेक्षा या भागात भविष्यातील अर्थप्रवास उंचावता राहणार आहे, असे यानिमित्ताने फ्रँकलिन टेम्पल्टन इन्व्हेस्टमेन्टचे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुडवा यांनी सांगितले. जागतिक सकल उत्पादनाच्या २४ टक्के हिस्सा युरोप राखते तर या भागातील व्यापारामार्फत जगाच्या ३४ टक्के महसूल हाताळला जातो, असेही ते म्हणाले. या भागात भारतीय गुंतवणूकदारांकडून गेल्या काही कालावधीत किमान गुंतवणूक राहिली आहे; मात्र येथील आर्थिक परिस्थितीही आता स्थिरावली असून आता वेगाने प्रसारित होणाऱ्या क्षेत्रात संधी आहे, असेही ते म्हणाले. युरोपातील कंपन्यांची उत्पन्न वाढ गेल्या किमान वर्षभरात तरी उंचावली (+७%) आहे; तर येथील कंपन्यांच्या कर्जाची पातळीही २००८ मधील आर्थिक संकटादरम्यानच्या ३१८ टक्क्यांवरून २०१३ अखेर २०५ टक्क्यांवर आली आहे, असे कंपनीचे विश्लेषक मिशेल क्लेमेन्ट्स यांनी नमूद केले.
फ्रँकलिन टेम्पल्टनद्वारे विविध ४०हून अधिक फंडांद्वारे गुंतवणूक होते आणि मार्च २०१४ अखेर तिच्याकडून झालेल्या मालमत्ता व्यवस्थापनाचा आकडा हा ४९ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीच्या चार जागतिक फंडांमधील निधी १३६.७ अब्ज युरो आहे.