मुंबईत फिरणाऱ्या उबरच्या टॅक्सीमध्ये लवकरच मोफत इंटरनेट उपलब्ध होणार आहे. या टॅक्सीतील प्रवासाच्या काळात ग्राहक मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
यासाठी उबर या कंपनीने एअरटेल कंपनीशी सहकार्य करार केला असून एअरटेल फोरजी सेवा यात उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचबरोबर एअरटेल मनी या एअरटेल मोबाइल व्ॉलेटच्या माध्यमातून प्रवासी टॅक्सीचे भाडे भरू शकणार आहेत.
शुक्रवारी एअरटेल आणि उबर या दोन कंपन्यांमध्ये सहकार्य करार झाला असून त्याअंतर्गत ग्राहकांना या सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या एअरटेल फोरजीची सेवा मुंबईत उपलब्ध होणार असली तरी लवकरच देशभरातील उबरच्या टॅक्सीमध्ये ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीचा काही काळ जे प्रवासी एअरटेल मनी वॉलेटच्या माध्यमातून पसे भरतील त्यांना ५०० रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकेल असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
ग्राहकांना प्रवासामध्ये अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरेल, असे मत उबर इंडियाचे अध्यक्ष अमित जैन यांनी स्पष्ट केले. अभिनव प्रयोगांतून ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी एअरटेल सतत नवीन प्रयोग करत असते, तर उबरसोबत झालेल्या सहकार्याचा ग्राहकांना नक्कीच फायदा होईल असे भारती एअरटेलचे ग्राहक व्यवसाय विभागाचे संचालक श्रीनी गोपालन यांनी स्पष्ट केले.