मुंबई : पेटीएमची संपूर्ण मालकीची उपकंपनी पेटीएम मनी लिमिटेडने म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी समर्पित अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल अ‍ॅपची घोषणा केली आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत यातून देशातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या दुप्पट करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

पेटीएम मनीच्या माध्यमातून गुंतवणूकदार स्मार्टफोनद्वारे म्युच्युअल फंडाच्या ‘डायरेक्ट प्लान’ची खरेदी आणि विक्रीही करू शकतात. मंगळवारपासूनच गुंतवणूकदार हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकतील. पेटीएम मनीमध्ये २५ मोठय़ा फंड घराण्यांचे योजना उपलब्ध आहेत. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्याधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, पेटीएम मनीच्या मदतीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे खऱ्या अर्थाने सार्वत्रिकीकरण होऊन ती लाखो भारतीयांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. ‘डायरेक्ट प्लान’मध्ये ही गुंतवणूक असल्याने ती शुल्करहित असेल. परिणामी येत्या पाच वर्षांत भारतातील गुंतवणूकदारांची संख्येत सध्याच्या तुलनेत दुपटीने वाढ होईल, असा दावाही त्यांनी केला.

‘फायद्यां’बद्दल अधिक स्पष्टता आवश्यक

फोनवर कळ दाबल्यासरशी म्युच्युअल फंडात गुंतविता आले पाहिजेत अशी संकल्पना पेटीएम मनीने मांडली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील वस्तू खरेदी असल्याचे पेटीएमच्या विजय शेखर यांना वाटते, याबद्दल खेद वाटतो. म्युच्युअल फंडाबाबत प्रबोधन केल्याशिवाय, केवळ सुलभ तंत्रज्ञानाधारीत प्रणालीतून गुंतवणुकीची सुविधा रिक्षाचालकासारख्या रोजंदारीवर पोट भरणाऱ्या व्यक्तीस निश्चितच हिताची नाही. आज गुंतविलेले ५०० रुपये हे नजीकच्या काळात ४८० रुपये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘मोफत’ सेवा देऊन केवळ ‘डायरेक्ट प्लान’मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या विकल्पाच्या ‘फायद्यां’बद्दल अधिक स्पष्टता आवश्यक आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही ई-व्यापार संकेतस्थळांवर उपलब्ध ‘एका शर्टावर एक पॅन्ट मोफत’ अशा पद्धतीने शक्य आहे काय?  लाखो ग्राहकांना म्युच्युअल फंडांपर्यंत नेणारा केवळ डिजिटल हा एकच मार्ग नसून हा गुंतवणुकीच्या सर्वाग नियोजन हा देखील महत्त्वाचा पैलू असून, तेथे सशुल्क सल्लागाराची भूमिकेला अद्याप खूप मोठा वाव आहे.

’  विद्या बाला. ‘फंड्स इंडिया’च्या संशोधन प्रमुख