Freedom 251 स्वस्तातील मोबाइल म्हणून चर्चेत आलेल्या आणि मालकीवरून वादात सापडलेल्या ‘रिंगिग बेल’च्या २५१ रुपयांच्या मोबाइल फोनसाठी चार महिन्यांपूर्वी नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्याचे प्रत्यक्षात वितरण शुक्रवारपासून सुरू होत आहे.
नोएडास्थित रिंगिंग बेल्स कंपनीने ‘फ्रीडम २५१’ नावाचा हा फोन बाजारात आणला असून आकाराने ४ इंच असलेल्या या फोनची किंमत वितरण खर्चासह (रु. ४०) २९१ रुपये इतकी आहे. या फोनसाठी नोंदणी झालेल्या २ लाख ग्राहकांपैकी पहिल्या टप्प्यात ५,००० जणांना तो लॉटरी पद्धतीने सोडत काढून वितरित केला जाणार आहे. ३० जूनपासून २ लाख फोन वितरित करण्याची घोषणा कंपनीने गेल्या महिन्यात केली होती. मात्र ही संख्या देशातील १९ राज्यांमध्ये १०,००० अशी खाली आणली गेली.