केंद्रीय अर्थमंत्रालयाने गुरुवारी १७ राज्यांना महसुली तूट भरपाईपोटी ९,८१७ कोटी रुपयांच्या अनुदानाचा दुसरा मासिक हप्ता गुरुवारी मंजूर केला.

या दुसऱ्या हप्त्याच्या मंजुरीमुळे, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल व मे अशा पहिल्या दोन महिन्यांत केंद्राकडून महसुली तूट अनुदान म्हणून एकूण १९,७४२ कोटी रुपये दिले गेले आहेत. घटनेच्या अनुच्छेद २७५ नुसार केंद्राकडून राज्यांना हे अनुदान दिले जात आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७ राज्यांना एकूण महसुली तूट अनुदान म्हणून १,१८,४५२ कोटी रुपये दिले जावेत, अशी शिफारस केली आहे. वर्षभरात १२ मासिक हप्त्यांमध्ये ही रक्कम राज्यांना दिली जाणार आहे. वित्त आयोगाने शिफारस केलेल्या या १७ राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, हरयाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.