देशातील इंधन तसेच ऊर्जा गटातील महागाईचा दर गेल्या महिन्यात  खाली आला आहे. करोना-टाळेबंदीचा हा परिणाम असल्याचे मानले जाते.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्यातर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या घाऊक किंमत निर्देशांकात इंधन, ऊर्जासह अन्नधान्य गटातील वस्तूंचाही समावेश असतो. मात्र टाळेबंदीमुळे निर्मित वस्तूंचे उत्पादन ठप्प असल्याने त्यांचा समावेश यंदाच्या महागाईच्या यादीत नाही.

निर्देशांकानुसार, प्राथमिक वस्तूंच्या किंमती ०.७९ टक्क्य़ांनी कमी झाल्या आहेत. आधीच्या महिन्यात, मार्चमध्ये त्यांचा दर ३.७२ टक्के होता. तर गेल्या महिन्यात इंधन व ऊर्जा गटातील वस्तूंच्या किंमती १०.१२ टक्के नोंदल्या गेल्या आहेत. आधीच्या महिन्यात तो १.७६ टक्के होता.

मार्चमध्ये घाऊक किंमत निर्देशांक अवघा एक टक्का असा चार महिन्यातील किमान स्तरावर नोंदला गेला. फेब्रुवारीमध्ये हा दर २.२६ टक्के होता. अन्नधान्य तसेच इंधन दरातील घसरणीमुळे महागाई दर सावरला होता. चालू आर्थिक वर्षांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेने महागाईच्या दराचा ३.६ ते ३.८ टक्के अंदाज बांधला आहे. करोना-टाळेबंदीमुळे महागाई दर, विशेषत: अन्नधान्याच्या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.