अरामको कंपनीच्या सौदीतील दोन प्रकल्पावरील शनिवारच्या ड्रोन हल्ल्यानंतर इंधन पुरवठय़ासह त्याच्या किंमतीवरही विपरित परिणामांची भीती व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ७२ डॉलरच्या उंबरठय़ावर असलेल्या खनिज तेलाच्या किंमती आता गेल्या चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर आहेत. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर लिटरमागे ६ रुपयांपर्यंत वाढून वित्तीय तूटही विस्तारण्याची शक्यता आहे.

अरामको कंपनीच्या सौदीतील दोन प्रकल्पांवरील शनिवारच्या ड्रोन हल्ल्यानंतर इंधन पुरवठय़ासह त्याच्या किमतीवरही विपरीत परिणामांची भीती व्यक्त होत आहे.

सोमवारीच तीन दशकांतील सर्वोच्च किंमतउसळी घेणारे खनिज तेल येत्या काही दिवसांत ७५ डॉलर प्रति पिंपाला गवसणी घालतील, अशी धास्ती आहे. त्याचबरोबर वाढत्या दरातील काळे सोने आयातीचा भार अर्थचिंतेतील सरकारी तिजोरीलाही सोसावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रमुख इंधन उत्पादक देशातील कंपनीच्या शनिवारच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती एकाच व्यवहारात थेट २० टक्क्यांपर्यंत उसळले. खनिज तेलाचे वायदे व्यवहार सुरू झाल्यापासून तसेच ९०च्या दशकाच्या सुरुवातीला झालेल्या आखाती युद्धानंतर प्रथमच ही सत्रकिंमतवाढ नोंदली गेली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ७२ डॉलरच्या उंबरठय़ावर असलेल्या खनिज तेलाच्या किमती आता गेल्या चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर आहेत.

खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ७० डॉलरच्या खूप पुढे राहिल्यास देशात पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती प्रति लिटर ५ ते ६ रुपयेपर्यंत वाढण्याची शक्यता बाजार, वित्त कंपन्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर वाढत्या दरातील आयात खर्चामुळे सरकारच्या वित्तीय तुटीचे निश्चित ३.३ टक्के प्रमाण बिघडण्याची साशंकताही वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय तेलमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी मात्र सौदीमार्फत भारताला नियमित इंधनपुरवठा होईल, अशी ग्वाही दिली आहे.

दरम्यान, सौदीतील इंधन कंपनीवरील हल्ल्याकरिता इराणकडे बोट दाखविणाऱ्या अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांची सप्ताहारंभाची सुरुवात घसरणीने झाली.

भारतात रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर इंधननिर्मिती प्रकल्प साकारणाऱ्या व प्रारंभिक खुल्या भागीदारीद्वारे आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात उतरण्याची तयारी करत असलेल्या अरामकोच्या सौदी अरेबियातील दोन प्रकल्पांवर शनिवारी ड्रोन हल्ला झाला. यामुळे कंपनीचे इंधन उत्पादन दिवसाला ५७ लाख पिंपाने कमी होत निम्म्यावर आले. यामुळे जागतिक इंधन पुरवठय़ातही ५ टक्के कपात झाली आहे.

भारताची एकूण गरज असलेल्या इंधनापैकी ८३ टक्के इंधन आयात केले जाते. इराकनंतर भारत सौदी अरेबियातून मोठय़ा प्रमाणात इंधन खरेदी करणारा देश आहे. गेल्या वित्त वर्षांत सौदीने भारताला ४.०३ कोटी टन खनिज तेल विकले. देशाने गेल्या वर्षांत एकूण २०.७३ कोटी टन तेल आयात केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका स्वयंपूर्ण होण्यासह निर्यातीबाबत आघाडीचा इंधन देश बनू पाहत आहे.