रुपयाच्या अवमूल्यनाची धास्ती; इंधनदराचा भडका कायम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेवर चिंतेचे अनोखे मळभ निर्माण झाले आहे. डॉलरच्या तुलनेतील रुपयाची नांगी ७२ च्याही अधिक खोलात गेली आहे. तर इंधन दराचा भडका आणखी विस्तारत चालला आहे. हे कमी काय देशात १० वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील व्याज गेल्या चार वर्षांत प्रथमच ८ टक्क्य़ांच्या वर झेपावले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर प्रति पिंप ७८ डॉलपर्यंत झेपावले आहेत. अमेरिकेकडून इराणसारख्या प्रमुख तेल उत्पादक देशावरील निर्बंध अधिक आक्रसत चालल्याने खनिज तेलाच्या किंमतीचा भडका उडत आहे. याचा परिणाम पेट्रोल तसेच डिझेलच्या किंमती नव्याने विक्रमी टप्प्यापर्यंत पोहोचण्यावर झाला आहे. इंधनदरवाढीने राजकीय वातावरण संतप्त होत असतानाच आंध्र प्रदेश, राजस्थानसारख्या काही राज्यांनी स्थानिक करकपात करून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

खनिज तेलाच्या दरवाढीचा विपरित परिणाम डॉलर-रुपयावर झाला आहे. विशेषत: तेल शुद्धीकरणसारख्या आयात कंपन्यांनी डॉलरची खरेदी केल्याने रुपयाचा तळ सोमवारी अधिक खोलात गेला. आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात रुपया ७२.६७ पर्यंत गटांगळ्या खाल्यानंतर सत्रअखेर शुक्रवारच्या तुलनेत ७२ पैशांनी रोडावत ७२.४५ या नव्या नीचांकात विसावला. १३ ऑगस्टनंतर रुपयाने प्रथमच या रूपात सर्वाधिक सत्रआपटी नोंदविली.

गेल्या आठवडय़ातील शेवटचे सत्र वगळता रुपयाची कमकुवतता गेल्या कालावधीत सलग राहिली आहे. रुपयाने २०१८ मध्ये आतापर्यंत १३ टक्क्य़ांची आपटी अनुभवली आहे. घसरत्या रुपयामुळे १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांचे दर वार्षिक ८ टक्क्य़ांपेक्षा अधिक असे गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च टप्प्यावर पोहोचले आहेत.

ऐतिहासिक तळातील रुपयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हान विस्तारत चालले आहे. अधिक धास्ती आहे ती वाढत्या तुटीची. यामध्ये चालू खात्यातील तसेच वित्तीय तुटीच्या भीतीचाही समावेश आहे. राखीव गंगाजळीचे प्रमाण कमी होण्यासह तुटीचे सावट अधिक गहिरे होत आहे.

डेट फंडातील निधीलाही गळती

डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयामुळे म्युच्युअल फंडातील डेट पर्यायाकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्याचे स्पष्ट होत आहे. ऑगस्टमध्ये गुंतवणूकदारांनी डेट फंडातून ६,८०० कोटी रुपये काढून घेतल्याचे फंड संघटनेच्या मासिक आकडेवारीद्वारे जाहीर झाले आहे. उलट वर्षभरापूर्वी याच कालावधीत या फंड प्रकारामध्ये ९,८१० कोटी रुपयांचा निधी ओघ होता. डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबतचे धोरण अवलंबिताना गुंतवणूकदारांनी वाढत्या महागाईची चिंता व्यक्त केली आहे.

रुपया ७३ पर्यंत घसरणार?

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण मार्च २०१९ अखेपर्यंत ७३ ची वेस ओलांडेल, असा अंदाज व्यक्त करतानाच सरकारने राखलेले वित्तीय तूट नियंत्रणाचे लक्ष्य बिघडण्याची भीती स्विस दलालपेढीने व्यक्त केली आहे. यूबीएसने आपल्या ताज्या अहवालात चालू वित्तवर्षअखेर रुपया ७३ पर्यंत घसरल्यानंतर चालू खात्यातील तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत २.७ टक्क्य़ांवर पोहोचेल, असे यूबीएसने म्हटले आहे. वाढत्या वित्तीय तुटीबरोबरच वस्तू व सेवा कराचे रोडावणाऱ्या महसूल संकलनाबद्दलही स्विस दलालपेढीने चिंता व्यक्त केली आहे. अप्रत्यक्ष करसंकलन गेल्या काही महिन्यांपासून घसरत चालले आहे.

सात आशियाई चलनांसाठी जोखीमस्थिती!

डॉलरच्या तुलनेत रुपया हा आशियातील सर्वाधिक कमकुवत चलन बनले असताना एकूणच सात प्रमुख आशियाई चलनातील जोखीम वाढत असल्याचे मत जपानी नोमुराने व्यक्त केले आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिकासारख्या देशांचे स्थानिक चलन अधिक तळात जाण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. ३० विकसित राष्ट्रांपैकी सात देशांच्या चलनावर डॉलरचा अधिक दबाव पुढील कालावधीत असेल, असे नोमुराने म्हटले आहे. भारतासारख्या देशात वाढत्या महागाईचे सावटही कायम राहण्याची शक्यता आघाडीच्या वित्तसंस्थेने व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel prices to increase as rupee falls to record low
First published on: 11-09-2018 at 01:52 IST