नोव्हेंबपर्यंत वीजनिर्मिती क्षेत्राला कोळसापुरवठय़ात ९ टक्क्य़ांनी घट

 नवी दिल्ली : सार्वजनिक मालकीच्या कोल इंडिया लिमिटेडकडून वीजनिर्मिती क्षेत्राला होणारा कोळसा पुरवठा, सरलेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या सात महिन्यांत ८.९ टक्क्य़ांनी घटून, २९१.४ दशलक्ष टनावर सीमित राहिला आहे. गेल्या वर्षी याच सात महिन्यांतील कोळसा पुरवठा ३२० दशलक्ष टनांच्या घरात जाणारा होता.

पाऊस हा कोळसानिर्मिती क्षेत्राचा सर्वात मोठा शत्रू असून, पावसाचा लहरीपणा आणि यंदा मुख्यत: लांबलेला पाऊस हंगाम जुलैपासून पुढे एकंदर कोळशाच्या उत्पादनांत घट हे यामागे प्रमुख कारण असल्याचे सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण केले आहे. उल्लेखनीय म्हणजे मंदावलेले अर्थकारण आणि ऊर्जा क्षेत्राकडून मंदावलेल्या मागणीचा या अधिकाऱ्याने उल्लेखही केलेला नाही.

कारण एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या सात महिन्यांच्या काळात कोल इंडियाच्या उत्पादनातील घट ही आधीच्या वर्षांच्या तुलनेत ७.७ टक्के इतकी आहे. या सात महिन्यांत कंपनीने देशभरातील वेगवेगळ्या खाणीतून ३३०.४ दशलक्ष मेट्रिक टन इतके, म्हणजे मागील वर्षी केलेल्या पुरवठय़ापेक्षा जास्त उत्पादन घेतले आहे. त्यामुळे पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले असले तरी मागणीतील घट त्यापेक्षा अधिक आहे.

कोल इंडियाने आगामी आर्थिक वर्षांत ७५० दशलक्ष टनांच्या वार्षिक कोळसा उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या घोषणेनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कोल इंडियाचे वार्षिक १,००० दशलक्ष टनांच्या उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

कोळसा खाणींच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राला वाव देणारे धोरण नव्या सरकारने अमलात आणले आहे. उत्पादन वाढीबरोबरच कोळशाची मागणीतही तीव्र स्वरूपाची वाढ होत आहे, असे मंत्रीमहोदयांनी नमूद करून या क्षेत्रातील खासगी आणि सरकारी कंपन्या दोहोंनाही चांगली संधी यातून निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.