देशातील विविध ६९ तेल व वायू उत्खनन साठय़ांची निविदा प्रक्रिया डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय तेल व वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी मुंबईत केली. डिसेंबरच्या सुरुवातीलाच सुरू होणाऱ्या या प्रक्रियेला जगभरातून प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सप्टेंबरच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने ६९ तेल व वायू साठय़ांच्या निविदा प्रक्रियेला संमती दिली होती. यापैकी ६३ साठे हे ओएनजीसी तर उर्वरित सहा साठे हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या अखत्यारित आहेत. या माध्यमातून ७०,००० कोटी रुपयांच्या इंधन साठय़ाला बाजारात वाव मिळेल. या माध्यमातून देशात प्रथमच महसूलावर आधारित इंधन साठे लिलाव प्रक्रिया होईल. यापूर्वी १९७० पासून ही प्रक्रिया सहभागी कंपन्यांच्या नफ्यातील भागीदारीद्वारे होत असे.