सलग दोन महिने निधीतील ओहोटी कायम राहिल्यानंतर ऑगस्टमध्ये गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये रकमेचा ओघ राखला आहे. या एकाच महिन्यात फंडांमध्ये २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तत्पूर्वी दोन्ही महिन्यातील एकत्रित निगरुतवणूक यापेक्षा चौपट होती.
सेबीच्या ताज्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये २३,७१३ कोटी रुपये गुंतविले. याउलट जून व जुलै या दोन्ही महिन्यात मिळून फंडातून काढून घेतलेली गुंतवणूकदारांची रक्कम एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. तर आधीच्या, जुलैमध्ये ५०,०६७ कोटी रुपये फंडातून काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत (एप्रिल ते ऑगस्ट) म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची रक्कम ६९,२५२ कोटी रुपये राहिली आहे. कंपनी समभाग, रोखे आदीच्या माध्यमातून करण्यात आलेली विविध म्युच्युअल फंडांमध्ये ऑगस्टअखेर ८.०५ लाख कोटी रुपये झाले आहेत. चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत एप्रिलमध्ये सर्वाधिक १.०६ लाख कोटी रुपये गुंतविले गेले आहेत. चालू आर्थिक वर्षांप्रमाणे गेल्या २०१२-१३ मध्येही अधिक, ७६,५३६ कोटी रुपये गुंतवणूक झाली होती. मात्र तत्पूर्वी सलग दोन वर्षांत ती घसरली आहे. त्याचप्रमाणे जागतिक आर्थिक मंदीच्या २००८-०९ या कालावधीतही ती नकारात्मक राहिली आहे. २००९-१० मध्ये ८३,०८० कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडांमध्ये झाली होती.