अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या व त्यानंतर सनदी लेखापालाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्या बाला या म्युच्युअल फंडांच्या संशोधनाशी बारा वर्षांहून अधिक काळ संबंधित आहेत. म्युच्युअल फंडांची वितरक कंपनी फंड्स इंडिया डॉट कॉमच्या म्युच्युअल फंड्स संशोधन प्रमुख विद्या बाला यांनी ‘लोकसत्ता’शी केलेल्या वार्तालापाचा हा संपादित अंश..

* म्युच्युअल फंडांच्या पतनिश्चितीस तुम्ही नुकतीच सुरुवात केलीत. पतनिश्चितीची तुम्हाला आवश्यकता का भासली?

– आम्ही म्युच्युअल फंडांचे वितरक आहोत. साहजिकच अनेक गुंतवणूकदार आमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी येतात. इंटरनेटच्या वाढत्या व्याप्तीमुळे गुंतवणूकदार चौकस झाल्याने सल्लागाराने सुचविलेला फंड योग्य की अयोग्य हे ताडून पाहतात. अन्य पतनिर्धारण करणाऱ्या संस्थांनी निश्चित केलेली पत पाहतात. या दृष्टीने आम्ही पत निश्चित करण्याचे धोरण अवलंबले.

* तुमची पत निश्चित करण्याची पद्धत काय आहे?

– आम्ही फंड प्रकारानुसार रोखे गुंतवणूक करणारे फंड, समभाग गुंतवणूक करणारे फंड व बॅलन्स्ड फंड असे तीन गट केले आहेत. समभाग गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी फंडांची मागील तीन वर्षांत किमान सरासरी मालमत्ता १०० कोटींपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. इंडेक्स फंड व गोल्ड फंड यांना हा मालमत्तेचा निकष लागू नाही. आम्ही फंडांची पत म्हणून एक ते पाच तारे या प्रकारे निश्चित केली असून एक तारा ही खालची तर पाच तारे ही सर्वोच्च पत आहे. विविध कालावधीतील परताव्याचा दर फंडाच्या निर्देशांकसापेक्ष फंडाच्या एनएव्हीतील चढउतार, एनएव्हीचे प्रमाणित विचलन या संख्यात्मक पद्धतीने फंडाला गुण दिले जातात व हे गुण ज्या पट्टय़ात असतात त्यानुसार फंडाची पत निश्चित केली जाते.

* आज भारतीय म्युच्युअल फंडांच्या विश्वात गुंतवणूकदारांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूकदराने नेमक्या कोणत्या फंडाची निवड करावी?

– फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने गुंतवणुकीची कालावधी वित्तीय ध्येये निश्चित करणे गरजेचे असते. वित्तीय ध्येय हे आठ ते दहा दिवसांसाठी तात्पुरती गुंतवणूक करणे येथपासून १०-१५ वर्षांनंतर गरज भासणारा निधी येथपर्यंतही असू शकतात. या प्रत्येक वित्तीय उद्दिष्टांसाठी वेगवेगळे फंड प्रकार उपलब्ध आहेत. या प्रत्येक फंडाच्या गुंतवणुकीतील जोखीम वेगवेगळी असल्याने यातील परताव्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. अनेकदा परताव्याच्या मोहाने आपल्यासाठी योग्य असलेल्या फंडाशी तडजोड करू नये.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा जोखमीची वर्गवारी निश्चित करणे. जोखीमेला भिणारा गुंतवणूकदार समभाग फंडात गुंतवणूक करतो म्हणाला किंवा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची निवड केली तर ती परतावो मिळविण्यासाठी केलेली तडजोड ठरेल. माझ्या मते हे टाळणे गरजेचे आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्याला जोखीम सहन करण्याची मर्यादा (रिस्क प्रोफाइल) जोखून घेणे. पाच गटांत विभागलेल्या जोखीम सहन करण्याच्या प्रकारानुसार फंडाची निवड करणेसुद्धा महत्त्वाचे आहे.

* अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या बचतीवर मिळणाऱ्या व्याजावर जगतात. एका बाजूला वाढती महागाई व दुसऱ्या बाजूला कमी होणारे व्याजदर अशा कात्रीत सापडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अनेक गुंतवणूक सल्लागार बॅलन्स्ड फंडाकडे वळण्याचा सल्ला देत आहेत. याबाबत तुमची भूमिका काय आहे?

– सर्वसामान्यांचे महिन्याचे उत्पन्न व्याजदर कमी झाल्यामुळे कमी होत आहे. परंतु स्थिर उत्पन्न गुंतवणुकीत पुनर्गुतवणुकीची जोखीम अविभाज्य असते. व्याजदराचेदेखील आवर्तन असते. व्याजदर जसे खाली जातात तसे वरदेखील जातात. आयुष्यात तुम्ही अस्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुका केल्या नसतील तर तडजोड म्हणून बॅलन्स्ड फंडाकडे वळणे योग्य किंवा अयोग्य हे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर ठरते. इक्विटी सेव्हिंग्स फंड किंवा  अर्ब्रिटाज फंड हादेखील बॅलन्स्ड फंडापेक्षा कमी जोखमीचा व करमुक्त उत्पन्न मिळविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचादेखील विचार करावयास हवा.