हिस्सा विक्रीच्या वदंतेने चर्चेत असलेल्या फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सने येत्या कालावधीत किरकोळ आरोग्य विमा व्यवसायावर अधिक भर देण्याचे निश्चित केले असून, या गटातील नव्या उत्पादनांच्या जोरावर पुढील तीन वर्षांत ५० टक्केव्यवसायवाढीचे लक्ष्य राखले आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत १४८० कोटी रुपयांचा विमा हप्ता संकलन करणाऱ्या कंपनीला विद्यमान वित्त वर्षांत २० टक्के विमा हप्ता संकलन वाढीची अपेक्षा असल्याचे फ्युचर जनरालीच्या आरोग्य विमा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीराज देशपांडे यांनी सांगितले.
कंपनीने आरोग्य क्षेत्रातील नवी विमा योजना बुधवारी मुंबईत सादर केली. ‘हेल्थ टोटल’ या व्यापक योजनेत व्हायटल, सुपरिअर आणि प्रीमियर ही तीन उपउत्पादने समाविष्ट आहेत. ३ लाख ते १ कोटी रुपये आरोग्य विमाछत्र असलेल्या या योजनेत कोणत्याही वयातील व्यक्तीला सहभागी होता येते.
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी के. जी. कृष्णमूर्ती राव व मुख्य परिचालन अधिकारी ईश्वरा नारायण एम. हेही यावेळी उपस्थित होते.
कंपनीचा आरोग्य विमा विभाग एकूण व्यवसायाच्या १४ टक्केहिस्सा राखत असून किरकोळ आरोग्य विमा व्यवसायाचे प्रमाण २३ टक्के आहे. १० लाख विमाधारक असलेल्या कंपनीने गेल्या वर्षांत १.८० लाख विमा दावे निकाली काढले आहेत.
कंपनीच्या ताफ्यात सध्या असणाऱ्या उत्पादनांची संख्या (४) येत्या काही वर्षांमध्ये १० ते १५ उत्पादने होतील; तसेच एकूण व्यवसायापैकी किरकोळ आरोग्य विमा व्यवसायाचा हिस्सा ६५ टक्क्य़ांपर्यंत वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.

मागे वळून पाहताना..
‘रिटेल गुरू’ किशोर बियाणी यांच्या फ्युचर ग्रुप आणि इटलीतील विमा कंपनी जनराली यांची संयुक्त सर्वसाधारण विमा कंपनी २००७ मध्ये भारतात अस्तित्वात आली. तर आरोग्य विमा व्यवसाय याच छत्राखाली २०१० मध्ये सुरू करण्यात आला. कंपनीतील हिस्सा विकण्याच्या चर्चेने फ्युचर समूह गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आला होता. सध्या जनरालीचा कंपनीत २४.५ टक्केतर शेंद्रा अॅडव्हायजरी सव्र्हिसेससह फ्युचर रिटेलचा ७४.५ टक्के हिस्सा आहे. एल अॅन्ड टी जनरल इन्शुरन्सने हिस्सा खरेदीसह कंपनीत ५१ टक्के मालकीची दाखविलेली इच्छा दोन वर्षांतच संपुष्टात आली.

‘बोट्सवानामध्ये भारताला गुंतवणूक संधी’
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />दक्षिण आफ्रिकेतील बोट्सवानासाठी हिरे, कृषी, खनिकर्म, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार ही प्राधान्य क्षेत्रे असून त्यात भारतासाठी गुंतवणूक संधी आहे, असे प्रतिपादन त्या देशाचे उपाध्यक्ष मोगवीत्सी इ मॅसिसी यांनी मंगळवारी येथे केले. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले मॅसिसी हे ‘भारतीय औद्योगिक महासंघा’ तर्फे (सीआयआय) आयोजित परिषदेत बोलत होते.
भारतासारख्या देशाच्या माध्यमातून बोट्सवाना अर्थव्यवस्था अधिक भक्कम होण्यास हातभार लागेल, असेही ते म्हणाले. भारतातील वित्त कंपन्यांना अनेक कर सवलतींचा लाभ बोट्सवानात उपलब्ध असून भारताच्या सहकार्याने आम्ही बोस्टवानात हिरे संस्था विकसित करत आहोत, असे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिका विकास संस्थेच्या (एसएडीसी) प्रसाराकरिता २५ व्यावसायिकांसह भारतात आलेल्या मॅसिसी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही राजभवन येथे भेट घेतली. मॅसिसी हे नवी दिल्लीत होणाऱ्या भारत-आफ्रिका परिषदेतही सहभागी होणार आहेत.