बिर्ला समूहातील केवळ वस्त्र विक्री क्षेत्रातील कंपन्यांचे एकाच कंपनीत विलीनीकरण होऊन एक दिवस होत नाही तोच किरकोळ विक्री क्षेत्रातील आघाडीच्या फ्युचर समूहातील फ्युचर रिटेल स्पर्धक भारती रिटेलमध्ये सहभागी करण्यास सोमवारी उभय कंपन्यांची मान्यता मिळाली आहे.
हा व्यवहार ९५० ते १,४५० कोटी रुपयांदरम्यान झाला असल्याची शक्यता आहे. या विलिनीकरणाला आता भारतीय स्पर्धा आयोगाची परवानगी आवश्यक ठरेल. उभयतांची आता २४३ शहरांमध्ये ५७० दालन संख्या होणार आहे.

भारतीय रिटेलचे प्रणेते समजले जाणाऱ्या किशोर बियाणी यांच्या फ्युचर समूहातील फ्युचर रिटेल ही किरकोळ विक्री क्षेत्रातील उपकंपनी आहे. सोमवारी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळात हा निर्णय झाल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविली आहे.
किरकोळ विक्रीऐवजी केवळ घाऊक बाजारात अमेरिकी कंपनी वॉलमार्टबरोबर भागीदारी कायम ठेवणाऱ्या भारती रिटेलने किरकोळ विक्री व्यवसायासाठी फ्युचर समूहाच्या माध्यमातून अन्य भागीदार निवडला आहे. याद्वारे फ्युचर व भारती रिलायन्स रिटेलचा एकत्रित सामना करतील.
भारती रिटेलने अन्य एका स्वतंत्र निर्णयानुसार तिच्या रिटेल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय नवा भागीदार फ्युचर रिटेलमध्ये विलीन केला आहे.
यासाठी भारती रिटेल २ रुपये मूल्याचा समभाग फ्युच्यर रिटेलच्या प्रत्येक समभागामागे देईल. तर फ्युचर रिटेल व्यवहारासाठी फ्युचर रिलेट २ रुपये मूल्याचा समभाग भारती रिटेलला देईल. भारती रिटेलमधील पायाभूत व्यवसाय फ्युचर रिटेलकडे वर्ग होणार आहे.
भारती रिटेल इझीडे नावाने देशभरात २१० दालने चालविते.
फ्युचर रिटेलने पॅन्टालूनमधील मोठा हिस्सा आदित्य बिर्ला रिटेल कंपनीला २०१२ मध्येच विकला होता. फ्युचर समूहाकडे सध्या बिग बझार, फूड बझार, फूड हॉल आदी नाममुद्रा आहेत.
फ्युचर समूहात फ्युचर रिटेल (हायपर मार्केट व सुपर मार्केट चालविणारी), फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स व फ्युचर कन्झ्युमर एन्टरप्राईजेस (निलगिरी दालनसाखळी खरेदी करणारी) या बाजारात सूचिबद्ध असणाऱ्या कंपन्या आहेत.