‘रिटेल गुरू’ किशोर बियाणी यांच्या फ्युचर समूहातील सध्या बिकट स्थितीत असलेली फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी) पादाक्रांत करण्याच्या तयारीत आहे. सर्वसाधारण विमा क्षेत्रातील या कंपनीचा निम्मा हिस्सा एल अ‍ॅण्ड टी खरेदी करण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे समजते.
या वृत्ताला कोणाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी उभय कंपन्यांमधील करार अंतिम टप्प्यात असल्याचे विशेष सूत्रांकडून        समजते.
लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमार्फत गेल्या काही वर्षांपासून वित्तीय सेवा क्षेत्रातील विस्तार जोरदार सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून एल अ‍ॅण्ड फायनान्स होल्डिंग या उपकंपनीमार्फत फिडेलिटी ताब्यात घेत म्युच्युअल फंड व्यवसायासही या समूहाने सुरूवात केली. तर आरोग्य विमा क्षेत्रात कंपनीने काही महिन्यांपूर्वीच स्वतंत्ररित्या पदार्पण केले होते.
‘बिग बझार’सारख्या आघाडीच्या ब्रॅण्डसह रिटेल क्षेत्रात वरचष्मा असलेल्या फ्युचर समूह वित्तीय सेवा क्षेत्रातही कार्यरत आहे. सर्वसाधारण विमा क्षेत्रातील त्याचे अस्तित्व गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. यासाठी समूहाने इटलीच्या जनराली समूहाबरोबर भागीदारी केली आहे.  फ्युचर जनराली या संयुक्त कंपनीत फ्युचर समूहाचा ७४ टक्के तर उर्वरित २६ टक्के हिस्सा इटलीच्या जनराली समूहाचा आहे. ७४ टक्क्यांमध्ये फ्युचर समूहाची मुख्य प्रवर्तक पॅण्टालुन रिटेलचा ५० टक्के तर बियाणी कुटुंबियांचा २४ टक्के हिस्सा आहे.
नव्या व्यवहारानुसार फ्युचर समूहाचा हिस्सा २४ टक्के होणार असून लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोची भागीदारी सर्वाधिक, ५० टक्क्यांपर्यंत असेल. जनरालीची भागीदारी सध्याच्या टप्प्यावर कायम राहील, अशीही शक्यता आहे.