News Flash

आठवडय़ाची मुलाखत : गुंतवणुकीबाबतचा भविष्याचा अंदाज तिमाही निकालांवरून बांधणे धोक्याचे

या निकालांबाबत निधी व्यवस्थापक कंपन्यांच्या नफ्याचे अंदाज बांधण्यात व्यग्र आहेत.

पुढील आठवडय़ापासून कंपन्या चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात करतील. या निकालांबाबत निधी व्यवस्थापक कंपन्यांच्या नफ्याचे अंदाज बांधण्यात व्यग्र आहेत. हे अंदाज कसे असतील व सामान्य गुंतवणूकदारांनी हे निकाल कसे बघावे याबाबत मार्गदर्शन करताहेत एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेडया खासगी गुंतवणूकदार सल्ला सेवा विभागाचे प्रमुख विनोद शर्मा

  • निश्चलनीकरणानंतर तिमाही निकाल जाहीर होण्यास कंपन्या पुढील आठवडय़ात प्रारंभ करतील. तुम्ही या निकालांकडे कसे पाहता?

मागील तिमाहीचे निकालांचा मोसम निश्चलनीकरणानंतरचा पहिला हंगाम असला तरी माझ्या मते, निश्चलनीकरणाचा संपूर्ण परिणाम जाणवण्यास चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापर्यंत वाट पाहावी लागेल. निश्चलनीकरणाचा परिणाम तिसऱ्या ऐवजी चौथ्या तिमाहीच्या निकालात अधिक जाणवेल.

समभाग विश्लेषकांनी कंपन्यांच्या उत्सर्जनाबाबतचे (ईपीएस) अंदाज कमी केले आहेत. परंतु उत्सर्जनाबाबतचे नक्की अंदाज बांधणे कठीण होत असल्याने कोणी आकडय़ांच्या रूपात मते व्यक्त करताना दिसत नाही.

गेल्या तिमाहीचे निकाल सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी धक्का देण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी चांगल्या निकालांची अपेक्षा आहे त्या कंपन्यांचे उत्सर्जन खालावलेले दिसेल व ज्या कंपन्यांचे उत्सर्जन खालावले असण्याची अपेक्षा आहे त्या कंपन्या अपेक्षेपेक्षा चांगले निकाल देतील.

कंपन्या निश्चलनीकरणामुळे झालेले नुकसान कसे व किती प्रमाणात या तिमाहीत दाखवतात यावर हे अवलंबून असेल. हे निकाल आभासी असल्याने या निकालांवर अवलंबून गुंतवणूकदरांनी भविष्यातील निकालांचे अंदाज बांधू नये.

  • लार्ज कॅप व मिड कॅप यांच्या वास्तवातील मूल्यांकनाबाबत तुमचा दृष्टिकोन काय आहे?

निश्चलनीकरणाचा परिणाम कंपन्यांच्या उत्सर्जनावर होणार असल्याने आजच्या वास्तवातील मूल्यांकनावर भाष्य करणे धोक्याचे आहे. सामान्य परिस्थितीत अंदाज व्यक्त करता येतो. बदललेल्या परिस्थितीत मूल्यांकनावर जाणवेल इतका परिणाम होणार असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही.

  • यंदाच्या तिमाहीत एखाद्या कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी नफा झाला व समभागाचे भाव पडले तर ती खरेदीची संधी समजावी काय? किंवा अपेक्षेहून अधिक नफा झाला व भाव वाढले तर त्या समभागाची अधिक प्रमाणात खरेदी करावी का? याबाबत गुंतवणूकदारांचे नेमके धोरण काय असावे, असे तुम्हाला वाटते.

आधी म्हटल्यानुसार निश्चलनीकरणाचा परिणाम कंपन्यांच्या उत्सर्जनावर दोन तिमाहीपर्यंत होणार असल्याने याच तिमाही निकालांवर विसंबून समभागाची खरेदी अथवा विक्री करू नये. बऱ्याचवेळा बाजार निकालांवर तत्कालीन प्रतिक्रिया (‘नी जर्क रिअ‍ॅक्शन’) देतो. लगेच खरेदी-विक्री केल्यास गुंतवणूकदारांना नुकसान होण्याची शक्यता आहे.

उदाहरणार्थ वाहन उद्योगात मारुती व टाटा मोटर्स यापैकी कोणाचे निकाल पहिल्यांदा लागतात यावर तत्कालीन प्रतिक्रिया उमटते. मारुतीचे निकाल पहिल्यांदा लागले तर वाहन उद्योगाच्या मूल्यांकनाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया असते.

परंतु हेच जर, टाटा मोटर्सचे निकाल पहिल्यांदा लागले तर एकूणच वाहन उद्योगाच्या समभागांमध्ये मंदी असल्याची धारणा झाल्याने या समभागांना विक्रीला सामोरे जावे लागते.

तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर अवलंबून दीर्घकालीन निर्णय घेऊ  नये. निवडक, परंतु टप्प्याटप्प्याने समभागांची खरेदी करावयास हरकत नाही. गुंतवणूक कालावधी तीन वर्षांहून अधिक असेल तर निवडक समभागांची खरेदी नक्कीच करायला हवी.

कारण निश्चलनीकरणाचा परिणाम चौथ्या तिमाहीत जास्त जाणवणार असल्याने वार्षिक निकालांनंतर खरेदी करेन, असे तुमचे ठरले असेल तर तशी संधी कदाचित मिळणार नाही; कारण निश्चलनीकरणाचा परिणाम समभागाच्या मूल्यांकनात गृहीत धरला असेल.

  • निश्चलनीकरणानंतर नेमक्या कुठल्या क्षेत्रांबाबत तुम्ही सकारात्मक आहात?

निश्चलनीकरणाच्या सर्वाधिक लाभार्थी बँकिंग क्षेत्र असल्याने बँकिंग क्षेत्राबाबत आमचा दृष्टिकोन नजीकच्या गुंतवणुकीसाठी सकारात्मक आहेच. या व्यतिरिक्त निवडक औषधनिर्माण, वाहन उद्योग, वस्त्रोद्योग क्षेत्रातील समभागाचे मूल्यांकन खरेदी योग्य पातळीवर आहे, असे आम्हाला वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 2:27 am

Web Title: future investments
Next Stories
1 कर्ज स्वस्त, पेट्रोल महाग
2 भारत-सिंगापूर दरम्यान दुहेरी कर प्रतिबंध करार
3 अर्धवर्षांत अर्थव्यवस्थेत ७.२ टक्क्यांनी वाढ; महागाई दरही नरमाईवर!
Just Now!
X