गजानन ऑइल प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या खाद्यतेलाच्या ‘गो’ या नाममुद्रेची घोषणा केली आहे. २०२०पर्यंत दरसाल ५०५० कोटींची विक्री उलाढालीचा कंपनीचा मानस असून पुढील दोन वर्षांत जेएनपीटीजवळ नवीन रिफायनरी सुरू करण्याचेही नियोजन आहे. सध्या अमरावती (महाराष्ट्र) येथील एकात्मिक प्रकल्पातून कंपनीकडून उत्पादन घेतले जाते.
गजानन ऑइलच्या सोयाबीन, सूर्यफूल आणि सरकी अशा तीन प्रकारच्या रिफाइन्ड तेलांचे अनावरण अलीकडे मुंबईत सैराट चित्रपटाची राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या उपस्थितीत झाले. ही उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात विभिन्न ठिकाणी उपलब्ध असतील. ब्रँडेड बाजारवर्गात शिरकाव झाल्याने अखिल भारतीय विस्तार सुकर होणार असून, टप्प्याटप्प्याने ते साधले जाईल, असे गजानन ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक नितीन जाधव यांनी सांगितले.
येत्या काही वर्षांत जेएनपीटीजवळ आणखी एक उत्पादन सुविधा तसेच सीमापार उत्तर अमेरिका (अर्जेटिना, ब्राझील) आणि आफ्रिकेपैकी एका ठिकाणी उत्पादन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 7:11 am