20 November 2017

News Flash

‘गार’चे भूत गाडले गेलेय : चिदम्बरम

सप्टेंबर २०१२ मध्ये म्हणजे प्रणव मुखर्जी यांच्या पश्चात अर्थमंत्रीपद स्वीकारल्यापासून घेतल्या गेलेल्या अनेक महत्त्वपूर्ण

वृत्तसंस्था/ हाँगकाँग | Updated: January 23, 2013 12:07 PM

विदेशी गुंतवणूकदारांच्या चिंताहरणासाठी अर्थमंत्री हाँगकाँग-सिंगापूरच्या दौऱ्यावर

सप्टेंबर २०१२ मध्ये म्हणजे प्रणव मुखर्जी यांच्या पश्चात अर्थमंत्रीपद स्वीकारल्यापासून घेतल्या गेलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या परिणामी भारतात गुंतवणूकदारांचे हित व स्वारस्य लक्षणीय स्वरूपात उंचावले आहे.
-इति पी. चिदम्बरम

भारताने ‘गार’ नामक भूत गाडले असून, किराणा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक खुली करण्याचे तसेच इंधन दरवाढीचे सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय पाहता अर्थव्यवस्थेचे पतमानांकन खाली खेचले जाण्याचा धोकाही दूर सरला आहे, अशा आश्वस्त करणाऱ्या शब्दात अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी येथे विदेशी गुंतवणूकदार समुदायाला भारतात आजही गुंतवणूकसुलभ वातावरण असल्याचा दिलासा दिला.
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये गुंतवणूकदार परिषदेसाठी दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेले चिदम्बरम यांनी ‘गार’सारख्या वादग्रस्त कर तरतुदीची वारसा त्यांच्या पूर्वसूरींकडून त्यांना मिळाल्याचे निक्षून सांगितले. ‘गार’मुळे उपस्थित झालेली परिस्थिती आपण कशी प्रभावीपणे हाताळल्याचे सांगत, हे भीतीदायक भूत गाडले गेले असल्याचेही आता पुरते सर्वश्रुत झाले असल्याचे त्यांनी येथे एका मुलाखतीद्वारे स्पष्ट केले.
तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मार्च २०१२च्या अर्थसंकल्पात ‘जनरल अॅण्टी अॅव्हायडन्स रूल्स’ अर्थात ‘गार’ ही कर नियमावली प्रस्तावित केली होती. कर प्रशासनाला अतिरिक्त अधिकार प्रदान करणाऱ्या या ‘गार’ प्रणालीने विदेशी गुंतवणूकदारांच्या मनात मोठी अडी निर्माण केली होती. गेल्याच आठवडय़ात चिदम्बरम यांनी या कर नियमावलीची अंमलबजावणी दोन वर्षे म्हणजे २०१६ पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सप्टेंबर २०१२ मध्ये म्हणजे प्रणव मुखर्जी यांच्या पश्चात अर्थमंत्रीपद स्वीकारल्यापासून घेतल्या गेलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या परिणामी भारतात गुंतवणूकदारांचे हित व स्वारस्य लक्षणीय स्वरूपात उंचावले आहे, असेही चिदम्बरम यांनी सांगितले.
सिटिबँक आणि बीएनपी परिबा या वित्तसंस्थांनी आयोजित केलेल्या ‘इंडिया फॉर इन्व्हेस्टमेंट’ परिषदेच्या दरम्यान चिदम्बरम यांनी जवळपास २०० आघाडीच्या गुंतवणूकदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. गुंतवणूकदारांकडून उपस्थित केल्या गेलेल्या चिंतांची दखल आपण घेतली असून, वित्तीय तुटीला तसेच परराष्ट्र व्यापारातील तुटीला आवर घालण्यासह सर्व ते उपाय सरकारने हाती घेतले असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
हाँगकाँगनंतर याच धर्तीच्या सिंगापूरमध्ये आयोजित गुंतवणूकदार परिषदेला चिदम्बरम हे बुधवारी हजेरी लावतील. भारताची अर्थव्यवस्था ही नि:संशय वेगवान प्रगती करीत असल्याचे सांगत, केवळ चीन आणि इंडोनेशिया हे देशच भारतापुढे असल्याचे त्यांनी सुचविले.

देशांतर्गत गुंतवणूकदारांची मात्र भीतीने गाळण
शतकी घसरणीने सेन्सेक्स पुन्हा २० हजारांखाली

स्टँडर्ड अॅण्ड पूअर्स (एस अॅण्ड पी) या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताची पतझडीची शक्यता अद्याप ५० टक्के कायम असल्याचे केलेल्या विधानाने मंगळवारी भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
गेले काही दिवस सरकारचा आर्थिक आघाडीवर निर्णय धडाका तसेच काही बडय़ा कंपन्यांच्या उमद्या तिमाही कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर बाजारात निरंतर तेजी सुरू होती. परंतु त्या तेजीत खंड पाडत आज बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १२० अंशांनी घसरून पुन्हा २० हजाराच्या पातळीखाली आला. आशियाई बाजारांकडून मिळालेल्या संमिश्र कलातून आज अनेक समभागांमध्ये नफारूपी विक्रीचा सपाटाही दिसून आला.  
गेले काही दिवस निरंतर वधारत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि बजाज ऑटो यामधील किरकोळ वाढ वगळता, सेन्सेक्समधील ३० पैकी २१ कंपन्यांच्या समभागांचे भाव आज गडगडले. एनटीपीसी आणि सन फार्मा या समभागांनी घेतलेल्या उसळीनेही बाजारातील पडझडीला काहीसा बांध घातला.

First Published on January 23, 2013 12:07 pm

Web Title: gar gost is now demolished chidambaram