‘फिच’कडून विकास दराच्या भाकितात घट

नवी दिल्ली : जागतिक आघाडीच्या ‘फिच’ या पतमानांकन संस्थेने निर्मिती क्षेत्रातील संथ हालचाल आणि मंदावलेले कृषी उत्पादन अशा नकारात्मक घडामोडींपोटी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज खुंटविला आहे. काही दिवसांमध्ये सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादन ६.८ टक्के असेल, असे तिचे भाकीत आहे. यापूर्वी ७ टक्के दराने अर्थविकास होईल, असे फिचने म्हटले होते.

नव्या वित्त वर्षांसाठी विकास दर अंदाजाबरोबरच नुकत्याच जाहीर केलेल्या जागतिक आर्थिक आढाव्यात फिचने चालू आर्थिक वर्षांच्या विकास दरही घटणे अपेक्षिले आहे. यंदा तो पूर्वी जाहीर केलेल्या ७.२ टक्के अंदाजापेक्षा कमी, ६.९ टक्के असेल, असे तिने स्पष्ट केले आहे.

फिचचा हा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू वित्त वर्षांकरिता केलेल्या सात टक्क्यांच्या भाकितापेक्षाही कमी आहे. २०१७-१८ या आधीच्या आर्थिक वर्षांत, भारताने ७.२ टक्के चा आर्थिक विकास दर नोंदवला आहे.

फिचच्या मते, २०२०-२१ सालात भारताला सात टक्क्यांपुढील विकास दर गाठता येईल. याचे कारणही दिले गेले आहे. वाढीव अर्थविकासासाठी आवश्यक असलेले निर्मिती तसेच कृषी क्षेत्र हे वर्षभर तरी बहरण्याची शक्यता नाही, असे तिने म्हटले आहे.

चालू अर्थहालचालींचा हवाला देताना ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ या  सलग दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर ६.६ टक्के असा कमी राहिल्याचे फिचने नमूद केले आहे. जुलै-सप्टेंबर व एप्रिल-जून या पहिल्या दोन तिमाहींमध्ये तो अनुक्रमे ७ व ८ टक्के असा उतरता राहिल्याचेही तिने म्हटले आहे.

मंदावलेल्या विकास दराची कारणमीमांसा करताना, फिचने गेल्या काही महिन्यातील बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांवरील संकट, अन्नधान्याच्या वाढत्या किमती यांचा पाढा वाचला आहे. तर येत्या कालावधीत डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा प्रवास, रिझव्‍‌र्ह बँकेचे व्याजदर धोरण यावरही नव्या वित्त वर्षांचा अर्थप्रतिसाद अवलंबून असेल, असे म्हटले आहे.

डिसेंबर २०१९ पर्यंत रुपया ७२ पर्यंत पोहोचेल; तसेच २०१९ मध्ये व्याजदर आणखी ०.२५ टक्का कमी होतील, असेही फिचला वाटते. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती प्रति पिंप ६५ डॉलरभोवती फिरतील, असेही फिचच्या अहवालाने म्हटले आहे.

या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने २०१९ मध्ये जागतिक विकासदरही कमी म्हणजे २.८ टक्के अंदाजला आहे. तर शेजारच्या चीनची प्रगती ६.१ टक्के दराने होईल, असे म्हटले आहे.