‘जीडीपी’ पाच टक्क्यांवर, सहा वर्षांचा तळ, मंदीचे सावट गडद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गेल्या वित्तीय वर्षांत पाच वर्षांच्या तळात गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आता  आणखी गडद होत आहे. देशाचा नव्या वित्त वर्षांचा प्रारंभही सुमार प्रवासाने झाला असून अर्थ प्रगतीचे ताजे मानक हे सहा वर्षांच्या खोलात गेले आहे.

वित्तीय वर्ष २०१९-२० मधील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील देशाचा विकास दर (सकल राष्ट्रीय उत्पादन) ५ टक्क्यांवर स्थिरावताना सहा वर्षांच्या किमान स्तरावर येऊन ठेपला आहे. निर्मिती आणि कृषी क्षेत्रातील संथ हालचालीमुळे दरवाढीला आळा बसला आहे.

यापूर्वी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन किमान ४.३ टक्के अशा प्रमाणात जानेवारी ते मार्च २०१३ दरम्यान नोंदले गेले होते. यंदाचा दर वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील तब्बल ८ टक्क्यांच्या तुलनेत थेट ३ टक्क्यांनी खालावला आहे.

गेल्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या १२.१ टक्क्यांवरून यंदा अगदीच ०.६ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. तर कृषी क्षेत्राचा प्रवास ५.१ टक्क्यांवरून वार्षिक तुलनेत निम्म्यापेक्षा कमी, २ टक्क्यांवर राहिला आहे. देशातील बांधकाम क्षेत्र ९.६ टक्क्यांपुढे यंदा ५.७ टक्क्याने विकसित झाले आहे. तर खनिकर्म क्षेत्राची वाढ शून्याच्या काठावरून यंदा २.७ टक्क्यांपर्यंत उंचावली आहे. विकास दर आधीच्या तिमाहीत ५.८ टक्के होता. तर गेल्या एकूण वित्तीय वर्षांत त्याने ६.८ टक्के असा गेल्या पाच वर्षांचा किमान स्तर अनुभवला.

क्रयशक्तीतील घट चिंताजनक

खरेदीदारांचा निरुत्साह आणि गुंतवणुकीचे आटते प्रमाण याचाही फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. केवळ सरकारकडून पैसा मोठय़ा प्रमाणात ओतला जात असला, तरी देशी आणि विदेशी गुंतवणुकीशिवाय आणि ग्राहकांच्या वाढत्या खरेदीशिवाय अर्थचक्र फिरते राहाणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.   त्या दृष्टीने क्रयशक्तीतील घट चिंताजनक आहे. २०१८च्या चौथ्या तिमाहीत खरेदीच्या मागणीचे प्रमाण १०.६ टक्के होते. ते २०१९-२०च्या पहिल्या तिमाहीत ३.१ टक्क्य़ांवर घसरले आहे. आठ क्षेत्रांपैकी पाच क्षेत्रांत विकास दर घसरणीला लागला आहे. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी गंभीर आहे.

अर्थव्यवस्थेतील मरगळ ही प्रामुख्याने देशांतर्गत तसेच जागतिक घडामोडींमुळे आहे. अर्थ उभारीसाठी सरकार उपाय योजत आहे. त्याचा परिणाम लवकरच दिसून देशाची अर्थव्यवस्था नजीकच्या कालावधीत वरच्या टप्प्यावर असेल.

  – के. व्ही. सुब्रमणियन,  मुख्य आर्थिक सल्लागार.

घसरणीची आकडेमोड..

क्षेत्र               एप्रिल-जून      एप्रिल-जून

२०१८               २०१९

उत्पादन        १२.१ टक्के     ०.६ टक्के

कृषी, मत्स्य    २ टक्के        ५.१ टक्के

बांधकाम        ९.६ टक्के      ५.७ टक्के