डिसेंबर २०१० ते जुलै २०१४ मध्ये तयार करण्यात आलेल्या डिझेलवरील बिट या हॅचबॅक श्रेणीतील वाहनांमध्ये सदोष क्लच पॅडल असल्याने त्या दुरुस्त करून देण्याचे आश्वासन अमेरिकी कंपनी जनरल मोटर्सने मंगळवारी दिले. यानुसार शेव्हर्ले नाममुद्रेतील बिटची १,०१,५९७ वाहने माघारी घेण्यात येणार आहेत.
डिझेलवरील बिटच्या संबंधित कालावधीत तयार करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी करून क्लच पॅडलमध्ये दोष आढळल्यास ते विनाशुल्क दुरुस्त करण्याची तसेच बदलून देण्याची तयारी यानिमित्ताने कंपनीने दाखविली आहे. कंपनी तिच्या देशभरातील २४८ वाहन सेवा केंद्रात यासाठीची आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहे.
कंपनीने २०१३ मध्येही १.१४ लाख वाहने माघारी बोलाविली होती. शेव्‍‌र्हलेच्या तवेरा या बहुपयोगी वाहनांमध्ये उत्सर्जनाविषयीच्या तक्रारी होत्या. कंपनीने ही वाहने २००५ ते २०१३ दरम्यान तयार केली होती. कंपनी सध्या तवेरा तयार करत नाही.
गेल्याच आठवडय़ात जपानच्या होण्डाने ९०,२१० वाहने माघारी बोलाविण्याची घोषणा केली होती. ऐतिहासिक वाहन माघारीमुळे फॉक्सव्ॉगन सर्वाधिक चर्चेत राहिला.