‘सीईओ’ पदासह पहिल्या महिला अध्यक्षाही
अमेरिकेतील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्स (जीएम)च्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरा यांच्याकडे अध्यक्षपदही चालून आले आहे. कंपनीच्या एखाद्या महिलेच्या रूपात इतिहासात प्रथमच हा दुहेरी पदमानाचा मुकुट विराजमान झाला आहे.
कर्मचारी ते संचालक या पदावर पोहोचलेल्या ५४ वर्षीय मेरी या कंपनीतील एकमेव व्यक्ती आहेत. कंपनीच्या संचालक मंडळातील १२ सदस्यांपैकी सध्याचे अध्यक्ष थेओडोर सोल्सो यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील. तर सोल्सो आता कंपनीचे स्वतंत्र संचालक राहतील.
जनरल मोटर्सच्या सर्वोच्च पदावर एका महिलेच्या नियुक्तीची घोषणा होत असतानाच कंपनीने लक्षणीय गुंतवणूक जाहीर केली आहे. यानुसार कंपनीने लिफ्ट या ‘कार पुलिंग’ व्यवस्थेत ५० कोटी डॉलर ओतण्याचे निश्चित केले आहे. यामुळे लिफ्टच्या चालकांना जीएमच्या वाहनांबरोबरच ती सवलतीच्या दराने भाडय़ानेही घेता येतील.
मेरी बॅरा या जानेवारी २०१४ मध्ये जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनल्या होत्या. एखाद्या वाहन कंपनीच्या सीईओ असणाऱ्या त्या पहिल्या महिला त्या वेळी ठरल्या होत्या. त्यांच्या पूर्वीचे डॅन अकर्सन हे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील कंपनीचे अध्यक्षपद सांभाळत होते. जनरल मोटर्समध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षपद एकत्ररीत्या सांभाळण्याची परंपरा यापूर्वी राहिली आहे. १९९३ नंतर एड व्हाईटाक्रे, रिक व्हॅगनर, जॉन स्मिथ यांनीदेखील अध्यक्षपद तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषविले आहे. फिट्झ हेंडरसन हे तर अवघे नऊ महिने ही दोन्ही पदे सांभाळत होते. २००९च्या सुमारास त्यांच्याच कालावधीत कंपनीला दिवाळखोरी अनुभवावी लागली. १९९३ पूर्वी, १९५८ पासून १९९२ पर्यंत रॉबर्ट स्टेम्पेल हेच जनरल मोटर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी असे दोन्ही पद सांभाळत होते.
नव्या अध्यक्षा मेरी या जनरल मोटर्सच्याच जीएम इन्स्टिटय़ूटमध्ये ८० च्या दशकात सहकारी विद्यार्थी म्हणून रुजू झाल्या होत्या. जनरल मोटर्समधील मनुष्यबळ विकास, निर्मिती, अभियांत्रिकी आदी विभागांत त्यांनी सुरुवातीला कार्य केले आहे.
मार्क्स स्टर्नबर्ग यांच्याकडे भारतातील उपाध्यक्षपद
व्यवस्थापनाची फेररचना करताना जनरल मोटर्सने तिच्या भारतातील व्यवसायाची जबाबदारी उपाध्यक्ष म्हणून मार्क्स स्टर्नबर्ग यांच्याकडे दिली आहे. मार्क्स यांच्याकडे कंपनीच्या विक्री विभागाचा पदभार असेल. हा बदल १ जानेवारीपासूनच झाला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मार्क्स यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील २६ वर्षांचा अनुभव असून यापूर्वी त्यांनी जनरल मोटर्स समूहातील ओपेलच्या युरोपातील ग्राहक व्यवसाय सांभाळला आहे.