अमेरिकेच्या जनरल मोटर्सने भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. याचबरोबर कंपनी १० नवी वाहने भारतीय बाजारपेठेत उतरविणार आहे. दरम्यान, कंपनीने गुजरातमधील उत्पादन प्रकल्प गुंडाळण्याचे जाहीर केले आहे.
कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरा यांनी शेव्‍‌र्हलेच्या निवडक वाहनांचे सादरीकरण नवी दिल्लीत बुधवारी केले. तत्पूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली. भारतीय बाजारपेठेवर कंपनीचा अधिक रोख असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
शेव्‍‌र्हले नाममुद्रेसह भारतीय वाहन बाजारपेठेत अस्तित्व राखणाऱ्या जनरल मोटर्सने येत्या पाच वर्षांत १० नवीन वाहने सादर करण्याचे ठरविले आहे. कंपनी तिच्या       महाराष्ट्रातील पुण्यानजीकच्या तळेगाव येथील प्रकल्पावर लक्ष केंद्रित करणार आहे.
येत्या दोन वर्षांत दोन नवीन वाहने सादर करण्याचे धोरण कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यानुसार कंपनीची ट्रेलब्लेझर हे एसयूव्ही व स्पिन हे बहुपयोगी वाहने बाजारपेठेत येतील. पैकी थायलॅण्डमध्ये तयार करण्यात येणाऱ्या ट्रेलब्लेझरची भारतात आयात करण्यात येईल तर स्पिन येथे तयार होईल.