कार व ट्रक निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या जनरल मोटर्स कंपनीने २००७ ते १४ या काळात बनविलेली १.५५ लाख कार माघारी बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेवरोले स्पार्क, बीट, एन्जॉय या वाहनांचा समावेश असून हा भारतातील आतापर्यंतचा वाहने माघारी बोलावण्याचा सर्वात मोठा आकडा आहे.
जनरल मोटर्स मूळची अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीने २००७ ते १४ या काळात बनविलेल्या कारची रिमोट चावीविरहित प्रवेश यंत्रणा सदोष आहे. यामुळे १.५५ लाख कार मागे बोलविण्यात येत असल्याचे कंपनीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.
सदोष वाहने परत मागविण्यासाठी संबंधितांना कळविण्यात येणार आहे. त्यांनी जवळच्या शोरूममध्ये जाऊन वाहनाची तपासणी करावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.
यापूर्वी फोर्ड कंपनीने २०१३ मध्ये फिएस्टा व फिगो या मॉडेल्सच्या १.३२ लाख कार माघारी बोलविल्या होत्या. तर जनरल मोटर्सनेच २००३ ते १४ या काळात निर्माण केलेल्या १.१४ लाख टवेरा कार परत मागविल्या होत्या. वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी सदोष यंत्रणा असलेल्या कार परत मागविण्याचा जुलै २०१२ मध्ये नियम केल्यापासून आजपर्यंत भारतात जवळपास ९ लाख कार माघारी बोलविण्यात आल्या आहेत.