ब्रॅन्डेड औषधांपेक्षा तब्बल ७० टक्के कमी तर विपणनापोटी होणाऱ्या खर्चात ४० टक्क्यांपर्यंतची बचत करणारी औषधे भारतीय बाजारपेठेत नव्याने उपलब्ध करण्यात आली असून ईकोमॅक रेमिडिजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० हजार दुकानांमधून ती थेट उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
जेनेरिक औषधांची चर्चा सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात आलेल्या मॅक रेमिडिजच्या ईकोमॅक रेमिडिज या नव्या उपकंपनीमार्फत अत्यावश्यक अशी १०० औषधे माफक दरात उपलब्ध होत असल्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रतिलाल राका यांनी केली. ही औषधे ब्रॅन्डेड औषधांपेक्षा ७० टक्के स्वस्त असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
अनेक कंपन्या त्यांच्या संशोधन व विकास, विपणन खर्च, मनुष्यबळावरील वेतन आदींचा हिस्सा औषधांच्या छापील किंमतींद्वारे वसूल करतात असे नमूद करून जेनेरिकच मात्र ब्रॅन्डेड औषधे ईकोमॅकमार्फत उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही ही औषधे थेट दुकाने, निवडक डॉक्टर तसेच सोशल नेटवर्किंग व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले. यामाध्यमातून देशात सध्या ४० ते ६० टक्के खर्च वाचविता येणार आहे; यामुळे औषध कंपन्यांच्या २० टक्के नफ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.
कंपनी देशभरातील ७ लाख किरकोळ दुकानांपैकी महाराष्ट्रात असलेल्या ५० हजार औषध दुकानांमधून महिन्याभरात निवडक १०० औषधे उपलब्ध करत असल्याचेही ते म्हणाले.
कंपनी अत्यावश्यक स्वस्त औषधांची संख्या ३०० च्या वर नेणार असून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तसेच पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
औषध बाजारपेठ :
रु. ६०,००० कोटी
वार्षिक वाढ : १० टक्के
विक्री दुकाने : ७ लाख
महाराष्ट्रातील संख्या : ५० हजार