समाजमाध्यमांवरील इंग्रजीचा पगडा ओसरत असून, प्रादेशिक भाषांमध्ये संदेश समायोजित करण्याचे आणि त्यासाठी वापरकर्त्यांकडून अस्सल टिप्पण्या, चित्र-आधारित कोटय़ा (मीम्स) आणि व्हिडीओ (यूजीसी) तयार करण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. मावळत्या २०१९ सालात दररोज ७ कोटींहून अधिक अस्सल-रचित संदेश विविध समाजमाध्यमांवर समायोजित केले गेले असल्याचे अधिकृत पाहणी सांगते.

खास प्रादेशिक भाषांना वाहिलेले समाजमाध्यम कंपनी ‘शेअरचॅट’कडून उपलब्ध तपशिलानुसार, मराठीसह, तमिळ, तेलुगू, पंजाबी आणि मल्याळम या प्रादेशिक भाषांचा समाजमाध्यमांवर बोलबाला वाढत असल्याचे दिसून येते. यातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्पादन नाममुद्रांचा जाहिरात अथवा ग्राहक संपर्क मोहिमांसाठी प्रादेशिक भाषेतील डिजिटल व्यासपीठांकडे ओढा वाढत असल्याचे शेअरचॅटचे मुख्य व्यवसाय अधिकारी सुनील कामत यांनी सांगितले.

सध्याच्या घडीला शेअरचॅटवर प्रादेशिक भाषांमधील ६० लाखांहून अधिक सक्रिय वापरकर्ते असून, साधारण शुभेच्छा संदेशांव्यतिरिक्त त्या त्या समयीच्या सामाजिक, राजकीय, नागरी विषयांवर अभिव्यक्तीसाठी त्यांच्याकडून या माध्यमांचा वाढता वापर होत असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले. शेअरचॅटवर सर्वाधिक टिपण्या या महाराष्ट्रात मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमधून असल्या तरी अगदी खेडापाडय़ांतून स्मार्टफोनधारक वापरकर्ते आहेत. तेथून मावळत असलेल्या २०१९ सालात सर्वाधिक समायोजित झालेल्या संदेशांचा विषय हा कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मदत, राज्यात निवडणुकानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात, आषाढी एकादशी, पुलवामातील अतिरेकी हल्ला, अयोध्या निकाल असे राहिले असल्याचे त्यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. शेअरचॅट वापरकर्त्यांकडून रचित संदेश हा पुढे व्हॉट्सअ‍ॅप व अन्य समाजमाध्यमांमधून फिरल्याचे ध्यानात येत असल्याचे त्यांनी सांगितले.