केंद्र सरकारने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी गंगा शुद्धिकरण मोहिमेबद्दल देशविदेशातील अनेक जल व पर्यावरण क्षेत्रातील कंपन्यांना उत्सुकता असून, जर्मनीत आवश्यक ते सर्व सहकार्य प्रदान केले जाईल, अशी ग्वाही जर्मनीचे भारतातील राजदूत मायकेल स्टाइनर यांनी दिली.
स्टाइनर यांच्या हस्ते जर्मन सहकार्याने आयोजित ‘इफाट इंडिया २०१४’ या पर्यावरण तंत्रज्ञानावर बेतलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे गुरुवारी उद्घाटन झाले. गोरेगावच्या मुंबई प्रदर्शन संकुलात हे प्रदर्शन शनिवापर्यंत सुरू असेल. या समयी भारत सरकारच्या नगरविकास मंत्रालयाचे सचिव शंकर अग्रवाल हेही उपस्थित होते. स्टाइनर यांच्या हस्ते या निमित्ताने ‘स्वच्छ गंगा पुरस्कारां’चेही वितरण करण्यात आले.
केंद्रातील सत्ताबदलाने देशाच्या उद्योगक्षेत्राचे उंचावलेले मनोबल आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक नामांकित वित्तसंस्थांनी भारताचा आर्थिक विकास दर २०१५ मध्ये सहा टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचे वर्तविलेले भाकीत यामुळे देशात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीत विदेशातून रस आणि सहभाग वाढताना दिसत आहे. यंदा या प्रदर्शनात सहभागी १२३ कंपन्यांपैकी ६५ टक्के कंपन्या या विदेशातील आहेत, हाच याचा प्रत्यय आहे, असे या प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या एमएमआय इंडियाचे मुख्याधिकारी भूपिंदर सिंग यांनी सांगितले. भारतात व्यवसाय विस्ताराच्या भरपूर शक्यता दिसत असल्यानेच इतक्या मोठय़ा संख्येने विदेशी कंपन्यांचे प्रदर्शनात स्वारस्य दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.