प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेत सुधार दिसत नसल्यावरून उद्योगक्षेत्रातून केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध निराशा वजा मत प्रदर्शित केले जात असतानाच देशातील तिसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी, विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांनी मात्र ‘निकाल दाखविण्यासाठी सरकारला अजून वेळ द्यावा लागेल’ अशी पावती राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला दिली आहे.
देशात ‘अच्छे दिन’ आल्याचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेत मात्र त्याचे प्रतिबिंब उमटत नाही, अशी टीका यापूर्वी आघाडीचे उद्योजक दीपक पारेख, राहुल बजाज यांनी मोदी सरकारवर केली होती. इन्फोसिस या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनीही आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याजोगे उल्लेखनीय असे संशोधन गेल्या सहा दशकांत भारतात झाले नसल्याचा उल्लेख आपल्या एका भाषणात केला होता.
दानशूरतेसाठी ओळखले जाणारे व विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी मात्र, अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष सुधारणा येण्यासाठी मोदी सरकारला अधिक कालावधी देण्याची गरज मांडली आहे. तिमाहीत वित्तीय निष्कर्ष जारी करताना भागधारकांसमोर केलेल्या भाषणात प्रेमजी यांनी, अर्थव्यवस्था सुधारल्याचे प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यासाठी आणखी कालावधी जाऊ द्यावा लागेल, असे नमूद केले.
चालू आर्थिक वर्षांच्या सरकारच्या ७.५ ते ८ टक्के विकासदराबाबत सहमती व्यक्त करत प्रेमजी यांनी देशाचा आगामी पथप्रवास हा अधिक आशादायी असेल, असे नमूद केले. स्वत: कार्यरत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उल्लेख करत प्रेमजी यांनी भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत अग्रगण्य स्थान असून नव्या कंपन्या ताब्यात घेण्यासाठी तसेच नव उद्यमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनी उत्सुक असल्याचेही सांगितले.

विप्रोकडून नफ्याची कामगिरी
इन्फोसिसपाठोपाठ विप्रोनेही नफ्यातील वाढ सरलेल्या जून तिमाहीत नोंदविली. दक्षिणस्थित विप्रोने एप्रिल ते जून २०१५ या तिमाहीत नफ्यातील ४ टक्के वाढ नोंदविताना तो २१८७.७० कोटी रुपये नोंदविला. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने एकूण उत्पन्नात १०.५ तर महसुलात १.१ टक्के वाढ राखली आहे. या तिमाहीत १.७९ अब्ज डॉलर महसूल मिळविणाऱ्या विप्रोने दुसऱ्या तिमाहीत १.८२ अब्ज डॉलरच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत ३५७२ कर्मचारी अधिक जोडले असून, ती संख्या आता एकूण १,६१,७८९ झाली आहे. तिमाहीदरम्यान कंपनीला ३६ नवे ग्राहक मिळाले.