सामान्यत: इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांच्या दालनात न सापडणाऱ्या अनेक अद्भुत आणि नावीन्यपूर्ण गॅझेट्सचे ई-दालन म्हणून गेल्या सहा वर्षांत ओळख निर्माण करणाऱ्या ‘गिझ्मोबाबा डॉट कॉम’ने व्यवसायवाढीच्या नव्या आवर्तनात प्रवेशाचे नियोजन आखले आहे. आगामी सहा महिन्यांत आजच्या तुलनेत दुप्पट म्हणजे दरमहा २ कोटींच्या सकल विक्री मात्रेचे (जीएमव्ही) लक्ष्य कंपनीने निर्धारित केले आहे.

जगभरातून आणि प्रामुख्याने चीनमधून आश्चर्यकारक आणि उच्च श्रेणीची इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स मिळवून त्यांची आपल्या नाममुद्रेसह ऑनलाइन विक्री करणारे गिझ्मोबाबा हे दालन मे २०१३ पासून कार्यरत आहे. कोणतीही प्रसिद्ध नाममुद्रा नसलेल्या या उपकरणांची तीन ते सहा महिन्यांच्या वॉरंटीसह विक्री हे गिझ्मोबाबाचे खास वैशिष्ट्य आहे. या कालावधीत ही उत्पादने निकृष्ट निघाल्यास ती बदलून देण्याची हमी आपले संकेतस्थळ देते, हे अनोखेपण ग्राहकांच्या पसंतीस उतरले असल्याचे गिझ्मोबाबाचे संस्थापक आणि मुख्याधिकारी आलोक चावला यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

एरवी स्वस्त, परंतु दर्जाबाबत शंकास्पद गॅझेट्सची विक्री करणाऱ्या ग्रे मार्केटला गुणात्मक पर्याय ठरण्यासह, गिझ्मोबाबाने दर्जाबाबत हमीही घेतली असल्याने, मुख्यत: १८ ते ३४ वयोगटातील मोठा ग्राहक वर्ग तिने आकर्षित केला आहे. हेड मसाजर, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंख्यासह टोपी, कार धुलाईसाठी स्प्रे गन ते अँटि-स्लीप मॅट इथपासून ते आयपी कॅमेरा व स्मार्ट होमपर्यंत अद्ययावत आणि अलभ्य उत्पादने या संकेतस्थळावर ३०० रुपये ते ३,००० रुपये किमतीत पाहायला मिळतात. आलोक चावला यांच्या मते, त्यांची स्पर्धा ही ग्रे मार्केट आणि तेथील निकृष्ट गॅझेट्सशी आहे. त्याचप्रमाणे स्नॅपडील, अ‍ॅमेझॉन यासारख्या अन्य ई-पेठांवर गिझ्मोबाबा अशी नाममुद्रा धारण केलेल्या परंतु बनावट वस्तूंची विक्री सर्रास सुरू असून, त्याबाबत संबंधित यंत्रणांकडे तक्रारही केली गेली असल्याचे चावला यांनी सांगितले.

गिझ्मोबाबावर सध्या महिन्याला ५० ते ६० लाख उलाढाली होत असून, प्रतिग्राहक सरासरी खरेदी मूल्य ८५० रुपये आहे. दिवसाला तीन ते पाच हजार नवीन ग्राहक संकेतस्थळाशी जोडले जात आहेत. परिणामी सध्या संकेतस्थळावर असलेली सुमारे एक कोटी रुपयांची सकल मासिक विक्री मात्रा (जीएमव्ही) ही पुढील सहा महिन्यांत दुप्पट होणे अपेक्षित असल्याचे चावला यांनी सांगितले. कंपनीची मुंबईनजीक भिवंडी येथे गोदाम व वितरण सुविधा असून, सध्या देशभरातील १४,००० पिन कोड ठिकाणांपर्यंत वस्तू घरपोच पोहोचत्या केल्या जातात.

चिनी उपकरणांबाबत दोन टोकाच्या धारणा आपल्याकडे आहेत. वस्तुत: भारतात विकल्या जाणाऱ्या अ‍ॅपल आयफोनपासून सर्व स्मार्टफोन्स हे चीनमधूनच येतात. परंतु ग्रे मार्केटमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट वस्तूंनी चिनी उत्पादनांची प्रतिष्ठा धुळीस मिळविली आहे. उच्च गुणवत्तेची परंतु किफायती उत्पादने मिळविण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आणि ते समर्थपणे पेललेही आहे. विक्री केलेल्या प्रत्येक उत्पादनांवर सहा महिन्यांपर्यंत बदलून देण्याची हमी याचा प्रत्यय आहे.’’

’ आलोक चावला, संस्थापक, गिझ्मोबाबा डॉट कॉम