करोना-टाळेबंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक तसेच आरोग्य चिंतेपोटी मौल्यवान धातूकडे गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जात असलेला ओघ सोने तसेच चांदीला त्यांच्या अनोख्या दरटप्प्यापुढे घेऊन गेला. जागतिक स्तरावरील या चित्राला कमकु वत अमेरिकी चलन डॉलरही कारणीभूत ठरले आहे. परिणामी एरवी हव्यास म्हणून हिनविणारे धातूमाध्यम जवळपास दशकाच्या दरविक्रमाला गवसणी घालणारे ठरले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य वेगाने खाली आल्याने सोने प्रति औन्स १,९५० डॉलरपुढे गेले. तर भारतात तोळ्यासाठी सोने दर ५० हजार रुपयांपलीकडे गेला. त्याचबरोबर चांदीचे व्यवहार किलोमागे ६० हजार रुपयांपुढील रकमेत झाले. अवघ्या काही तासांच्या फरकामुळे मौल्यवान धातूतील चमक अचानक गडद झाली आहे.

एका रात्रीत सोने तसेच चांदीसाठीची मागणी अचानक वाढल्याने दोन्ही प्रमुख मौल्यवान धातूच्या दरांमध्ये उसळी नोंदली गेली आहे. सोन्याने ९ वर्षांचा तर चांदीने सात वर्षांहून अधिक कालावधीचा विक्रम नोंदविला आहे. सोने-चांदीचे दर येत्या काही दिवसांमध्ये आणखी पुढे जाण्याची शक्यता सराफपेढय़ा, वायदे बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

टाळेबंदी शिथिल होत असताना औद्योगिक – उत्पादन निर्मिती हालचाल पूर्वपदावर येण्याच्या आशेने भारतातील वायदेमंचावर चांदीचे दर किलोसाठी थेट ६ टक्यांहून अधिक वाढल्याचे चॉइस ब्रोकिं ग या दलालीपेढीच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोन्याच्या तुलनेत येत्या कालावधीत चांदीसाठी अधिक मागणी राहील, असे निरीक्षण-भाकीतही वर्तविण्यात आले आहे. चांदी किलोसाठी येत्या काही महिन्यांमध्ये ७५ हजार रुपयेपर्यंत जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या सहा महिन्यात २० टक्यांहून अधिक परतावा देणारे के वळ सोने हेच गुंतवणूक माध्यम ठरल्याने खरेदारांची सोन्याकडील कल स्पष्ट झाल्याचे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आदित्य पेठे यांनी म्हटले आहे.  करोनोत्तर कालावधीत ग्राहकांचा मौल्यवान धातूकडील ओढा अधिक वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चांदीला सोन्याची झळाळी

सोन्याबरोबरच चांदीची मूल्य कामगिरी पिवळ्या धातूला मागे टाकणारी ठरली आहे. यापूर्वी सोने व चांदीचा (अनुक्रमे १० ग्रॅम व १ किलो) दर जवळपास समान पातळीवर होता. मात्र त्यात पुन्हा आता १० हजार रुपयांहून अधिक फरक नोंदला गेला आहे. चालू – २०२० वर्षांत सोन्याने २८ टक्के  परतावा दिला आहे. तर चांदीबाबत हे प्रमाण अधिक, ३३ टक्के  आहे. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीचा दर गेल्या तीन दिवसातच किलोमागे तब्बल ८,५०० रुपयांनी वधारला आहे. दिवसाच्या व्यवहारातील सोन्यातील १ टक्के पेक्षा चांदीच्या दरातील झेप अधिक, ६ टक्के  राहिली आहे.