२०१९ सालातील जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर २.९ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) सोमवारी व्यक्त केला. विशेषत: भारतासारख्या काही उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील ‘नकारात्मक धक्क्य़ांचे’ कारण त्यासाठी देण्यात आले आहे.

डावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक महासंघाच्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक परिषदेच्या उद्घाटनापूर्वी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’ला (डब्ल्यूइओ) अद्ययावत आकडेवारी देताना नाणेनिधीने भारताच्या बाबतीत २०१९साठी वर्तवलेला विकासदराचा अंदाज सुधारून ते ४.८ टक्के इतका केला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढ २०१९च्या अंदाजे २.९ टक्क्य़ांपासून २०२०मध्ये ३.३ टक्के आणि २०२१साठी ३.४ टक्के इतकी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा सुधारित बदल २०१९ आणि २०१०साठी ०.१ टक्क्य़ांनी, तर २०२१साठी ०.२ टक्क्य़ांनी कमी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या अधोमुख पुनरीक्षणात खासकरून भारतासह काही उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांमधील नकारात्मक आश्चर्य प्रतिबिंबित होते, ज्यामुळे येत्या दोन वर्षांसाठीच्या वाढीच्या अंदांजांचे पुनर्मूल्यांकन करणे भाग झाले. काही प्रकरणांमध्ये, हे पुनर्मूल्यांकन वाढलेला सामाजिक असंतोषही प्रतिबिंबित करते, असे आयएमएफने म्हटले आहे.