जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या करोनारूपी वैश्विक साथीच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ५.८ ते ८.८ लाख कोटी डॉलरचा फटका बसेल, असा अंदाज आशियाई विकास बँकेने (एडीबी) ने बांधला आहे.

करोनाचे उगमस्थान असलेल्या चीनला १.१ ते १.६ लाख कोटी डॉलरचे नुकसान होऊ शकते, असे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. १२ मेपर्यंत २१३ देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला असून या दरम्यान ४० लाख बाधित तर २.८० लाख मृत्युमुखी पडल्याचे आंतरराष्ट्रीय बँकेने म्हटले आहे.

करोना संकटाचा सर्वाधिक विपरित परिणाम दक्षिण आशियाई राष्ट्रांवर होत असून त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पादन १४२ ते २१८ अब्ज डॉलर राहण्याची शक्यताही बँकेने शुक्रवारी व्यक्त केली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या फटक्याची तुलना सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ६.४ ते ९.७ टक्क्य़ांबरोबर करण्यात आली आहे.

चीन, भारताचा समावेश असलेल्या दक्षिण आशियाचा विकास दर करोनामुळे ३.९ ते ६ टक्के असेल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. भारतासह पाकिस्तान, बांगलादेशसारख्या देशांमध्ये टाळेबंदीचे कडक पालन होत असल्याने अर्थचक्र न फिरणे स्वाभाविक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

आशिया व पॅसिफिक भागातील अर्थव्यवस्थेचा फटका १.७ लाख कोटी डॉलपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.