भावात वाढीचा अ‍ॅसोचेमचा कयास

जागतिक राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे मौल्यवान धातूच्या दरांमध्ये पुढील काही काळ अधिक चमक राहील, असा अंदाज उद्योग संघटना ‘अ‍ॅसोचेम’ने व्यक्त केला आहे.

ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याचे दर तोळ्यासाठी ३० हजार रुपयांखाली आले आहेत. खरेदीदार, गुंतवणूकदारांसाठी ही संधी मानली जात असली तरी अधिक मागणीमुळे सोने दरांमध्ये पुढील कालावधीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘अ‍ॅसोचेम’चे महासंचालक डी. एस. रावत यांनी म्हटले आहे की, सोन्याचे १० ग्रॅमसाठीचे दर पुढील कालावधीत ३३,५०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय तसेच आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असल्याने मौल्यवान धातूंच्या दरांवर वाढीचा परिणाम होऊ शकतो.

सोन्याची वाढती आयात रोखण्यासाठी सरकारने मौल्यवान धातूवर र्निबध आणले होते तसेच आयात शुल्क मर्यादा विस्तारली होती. याचा परिणाम सोने आयात गेल्या नऊ महिन्यांमध्ये घसरून (५८.९६%) २७० टनवर आली आहे. तर जानेवारी २०१६ पासून सोने दर २५ टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोने त्याच्या गेल्या तिमाहीतील तळात आले आहेत.