मुंबई : वाडिया समूहाने प्रवर्तित केलेल्या गो एअरलाइन्सने ३,६०० कोटी रुपयांच्या समभाग विक्रीचा प्रस्ताव सेबीला सादर केला आहे. वाडिया समूहाची ही कंपनी वाजवी दर आकारणारी नागरी विमान सेवा आहे. १५ वर्षांपूर्वी उड्डाणाला सुरुवात केलेल्या या कंपनीने नुकतेच स्वत:ला ‘गो फस्र्ट’ या नाममुद्रेत परावर्तन केले. उभारण्यात येणाऱ्या रकमेचा विनियोग प्रामुख्याने जुनी देणी फेडण्यास करण्यात येणार आहे. करोना संक्रमणामुळे जगभरात नागरी हवाई वाहतूक ठप्प झाल्याने या क्षेत्रातील कंपन्यांना सध्या मोठा तोटा होत आहे.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कंपनीच्या भविष्यातील विस्ताराबाबत माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात मोठ्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आहे.

या योजनांची पूर्तता करण्यासाठी मोठे भांडवल उभारणी आवश्यक आहे. सार्वजनिक विक्रीपूर्व समभाग साहसी भांडवलदारांना विकून १,५०० कोटी रुपये जमा करण्याचीही कंपनीची योजना आहे.

एप्रिल २०१९ मध्ये देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी जेट एअरवेजने गाशा गुंडाळ्यानंतर विमान उड्डाणांच्या संख्येनुसार स्पाइसजेट आणि इंडिगोनंतर गो एअरलाइन्स (इंडिया)चा क्रमांक लागतो.

या भांडवलाचा विनियोग जुनी देणी फेडण्याबरोबर विद्यमान मार्गावर वारंवारता वाढविण्यासोबत काही नवीन मार्गांवर विमान वाहतूक करण्याचे कंपनीचे नियोजन असल्याचे कंपनीने याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.