गृहवित्त क्षेत्रात ‘गोदरेज हाऊसिंग फायनान्स’ या कंपनीच्या स्थापनेसह गोदरेज समूहाने वित्तीय सेवा क्षेत्रातील प्रवेश मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. उल्लेखनीय म्हणजे ६.६९ टक्क्यांपासून सुरू होणारी घरांसाठी कर्ज योजना कंपनीने जाहीर केली असून, तीन वर्षांत १०,००० कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट राखले आहे.

गोदरेज हाऊसिंग फायनान्स मुंबई, राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीआर), पुणे आणि बंगळूरुमधील गृह खरेदीदारांना वाजवी, जलद आणि लवचीक गृह कर्ज देईल. कंपनीने वित्तपुरवठा करण्यासाठी समूह कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजसह अन्य विकासकांबरोबर करार केला आहे. प्रामुख्याने लवचीकता, सर्वात कमी व्याजदर आणि गरजेनुसार कर्ज आणि अटी-शर्तीच्या माध्यमातून कर्जाचे वैयक्तिकीकरण केले जाईल, असे गोदरेज हाऊसिंग फायनान्सचे अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी स्पष्ट केले.

ही कंपनी गोदरेज समूहासाठी वाढीचा आणखी एक महत्त्वाचा आधारस्तंभ असेल. स्थावर मालमत्ता विकास उद्योगाच्या वाढत्या औपचारिकपणाने गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा अशा एकत्रितपणे व्यवसाय वाढविण्याची संधी यातून मिळेल, असे नमूद करून पिरोजशा गोदरेज यांनी स्पष्ट केले की, आमच्या ग्राहकांना वेगवान आणि लवचीक शर्तीवर आधारित गृह कर्ज देऊन मूळ गृहबांधणी क्षेत्रातील मूल्यवृद्धीची संधी साधली जाईल. भविष्यात गोदरेज हाऊसिंग फायनान्स घरांसाठी कर्जासोबत नजीकच्या काळात गोदरेज समूहाच्या अन्य उत्पादनांसाठी वित्तसाहाय्य उपलब्ध करून आपल्या सेवांचा विस्तार करेल, असे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.