मौल्यवान धातूला दरचकाकी

मुंबई : मौल्यवान धातूच्या दरांमध्ये पुन्हा दरउसळी अनुभवली गेली आहे. सोन्याच्या किंमती बुधवारी तोळ्यासाठी ४९ हजार रुपयांपुढे पोहोचल्या. तर चांदीचा किलोचा दर ७२,५०० पर्यंत गेला आहे.

सोन्याच्या किमती दोन महिन्यात तोळ्यामागे ५ हजार रुपयांनी वाढल्या आहेत. अमेरिकी रोख्यांवरील घसरते व्याज तसेच कमकुवत डॉलरमुळे धातूकडील गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती प्रति औन्स १,९०० डॉलरपर्यंत झेपावल्या आहेत. त्याचे पडसाद येथील वायदा मंचावरही उमटले आहेत.

एमसीएक्स या वायदा मंचावर सोन्याच्या किंमती तोळ्यासाठी ४९ हजारावर धडकल्याची माहिती देतानाच मौल्यवान धातूचा दर कमी झाल्यास तो ४७,५०० रुपयांपर्यंत येईल, असा अंदाज एम्के ग्लोबल फायनान्शिअल सव्र्हिसेसच्या चलन संशोधन विभागाचे प्रमुख राहुल गुप्ता यांनी सांगितले.

सोन्याच्या किंमती गेल्या साडे चार महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचल्याचे नमूद करत मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सव्र्हिसेसच्या वायदा संशोधन विभागाचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी, भारतीय चलनात सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी येत्या काही कालावधीत ४९,३६० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे नमूद केले आहे.