भांडवली बाजारात नरमाईचे वातावरण असतानाच सराफा बाजारातील मौल्यवान धातूंचे दरही कमालीचे कमी ओसरताना दिसत आहेत. शुक्रवारी तोळ्यासाठी सोने दर गेल्या सहा महिन्यात प्रथमच ३० हजार रुपयांवर स्थिरावले. तर चांदीही आता किलोमागे ५८ हजार रुपयांच्या खाली आली आहे.
लग्नसराईचा हंगाम असूनही सराफा बाजारातील चमक गमावणे हे उल्लेखनीय आहे. सोन्याच्या भावाची अलीकडेच तोळ्यासाठी कमाल ३५ रुपयांनजीक ऐतिहासिक घोडदौड सुरू असल्याचे दिसून आले आहे. तर चांदीचा भावही किलोमागे ७५ हजार रुपयांपुढे जाऊन ओसरला आहे.
शुक्रवारअखेर मुंबई सराफा बाजारात सोने १० ग्रॅमसाठी १९० रुपयांनी स्वस्त झाले. स्टँडर्ड सोने प्रति १० ग्रॅम ३०,०९० रुपयांवर आला आहे. तर शुद्ध सोनेही याच वजनासाठी याच प्रमाणात स्वस्त झाल्याने ३०,२२५ रुपयांवर स्थिरावले आहे. गेल्या सहा महिन्यात सोन्याने प्रथमच हा भाव दाखविला आहे. याचबरोबर शुक्रवारी चांदीच्या दरानेही मोठी घसरण नोंदविली. जवळपास दीड महिन्याचा नीचांक नोंदवून चांदीचा किलोचा भाव एकदम ८९० रुपयांनी खाली आला आणि किलोमागे त्याला  ५७,२२० रुपयांचा भाव मिळाला.