सरकारच्या एक टक्का उत्पादन शुल्कविरोधात सराफांनी पुन्हा बंद पुकारला असून सोमवारपासूनचे हे आंदोलन आता तीन दिवसांसाठी असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राजधानी नवी दिल्लीसह देशाच्या विविध भागातील सराफ पेढय़ांनी आपली दालने सोमवारपासून तीन दिवसांकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’चे उपाध्यक्ष सुरिंदर कुमार जैन यांनी दिली.

उत्पादन शुल्क वसुलीच्या विभागाच्या कार्यपद्धतीबद्दलची नाराजी यंदाच्या बंदद्वारे व्यक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले.

या दरम्यान देशातील मोठय़ा तसेच छोटय़ा शहरातील सराफ दालने सुरू होणार नाहीत, असेही नमूद करण्यात आले.

आंदोलकांच्या नेत्यांनी सोमवारी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे निदर्शने केली. ‘ऑल इंडिया जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’, ‘इंडिया बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशन’ यांनी मात्र या तीन दिवसांच्या बंदला पाठींबा दिला नाही.

याबाबत सरकार पातळीवर शुल्क आकारणीबाबत आणखी सुसुत्रता आणण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच नवा अध्यादेश जारी होईल, अशी आम्हाला आशा असल्याचे फेडरेशनचे संचालक अशोक मिनावाला यांनी म्हटले आहे.

१ मार्चपासून लागू झालेल्या चांदीवगळता इतर मौल्यवान धातूवरील एक टक्का उत्पादन शुल्कविरोधात सराफांनी महिन्याहून अधिक कालावधीसाठी बंद आंदोलन केले होते.

यानंतर ते १३ एप्रिल  रोजी मागे घेण्यात आले. त्याचवेळी काही संघटनांनी ते तूर्त मागे घेतले असल्याचे स्पष्ट केले होते.

आंदोलनातील फूट यंदाही कायम असल्याचे दिसून येते. सराफ विरोधानंतर सरकारने याबाबत एक समिती नेमली आहे.

‘ऑल इंडिया बुलियन ज्वेलर्स आणि सुवर्णकार फेडरेशन’च्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोमवारी सरकारविरोधात ‘भीक मागो आंदोलन’ करणारे सराफ व्यावसायिक.