अक्षय्यतृतीयेला सोने मागणीत १० टक्के वाढ

सरकारच्या उत्पादन शुल्कविरोधातील सलग ४२ दिवसांच्या बंदमुळे हुकलेला गुढीपाडव्याचा मुहूर्त सोमवारी सराफांच्या पथ्यावर पडला. अक्षय तृतियेच्या निमित्ताने सोने मागणीत दुहेरी आकडय़ांची वाढ नोंदली गेल्याचे मानले जात आहे.
गेल्या अक्षय तृतियेच्या तुलनेत यंदाच्या मुहूर्तावर सोने खरेदीदारांकडून १० टक्क्य़ांपर्यंतची मागणी नोंदविली गेल्याचे आकडे सराफ व्यावसायिक देत आहेत. तोळ्यासाठी ३० हजाराच्या आत असणाऱ्या किमती सोने धातूतील मागणीवर विपरित परिणाम करणार नाहीत; उलट गुढीपाडव्याची हुकलेली संधी यानिमित्ताने मिळेल, असा आशावाद उद्योगातून पूर्वीपासूनच व्यक्त होत होता. सोमवारी फार वाढ नसलेल्या सोने-चांदीच्या धातूंची ग्राहकांकडून खरेदी झाली. मुंबईसारख्या शहर, उपनगर व नजीकच्या परिसरात एरवी सोमवारी अन्य दुकानांप्रमाणेच सराफ दालनेही बंद असतात. मात्र यापूर्वीचा बंद आणि चालून आलेला मुहूर्त या पाश्र्वभूमीवर सराफ व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने आपली दालने सुरू ठेवली होती. दागिन्यांच्या घडणावळीवर थेट ५० टक्क्य़ांपर्यंत सवलत दिली गेली.
अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर मुंंबच्या सराफा बाजारात सोने व चांदीच्या दरात मात्र किरकोळ घसरण नोंदली गेली. स्टॅण्डर्ड सोने तोळ्यामागे दिवसअखेर ८५ रुपयांनी घसरले. तर शुद्ध सोनेही याच प्रमाणात खाली आले. मौल्यवान धातूचा भाव आता ३० हजार रुपयांच्या उंबरठय़ावर आहे. तर चांदीतील १५ रुपयांची नरमाई पांढऱ्या धातूला ४१,४०० रुपयांवर स्थिरावण्यास कारणीभूत ठरली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औन्स १,३०० डॉलरभोवती आहेत.