सोन्यासारख्या मौल्यवान धातूबाबत भारतीयांचा गेल्या वर्षांत राहिलेला कल अनोख्या रूपात पुढे आला आहे. २०१४ मध्ये सोन्यातील गुंतवणूक मागणी निम्म्याने रोडावली असली तरी आयातीवरील र्निबध कायम e01असतानाही सोन्याच्या दागिन्यांची मागणी मात्र विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे.
‘जागतिक सुवर्ण परिषदे’ने सरत्या वर्षांतील मौल्यवान धातूचा कल स्पष्ट करताना भारताची सोने मागणी १४ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. २०१४ मध्ये या देशाने ८४२.७० टन सोने मागणी नोंदविली आहे. २०१३ मध्ये ती जवळपास १,००० टन, ९७४.८० टन होती. सोने आयात मात्र ७६९ अशी आधीच्या वर्षांतील ८२५ टनपेक्षा यंदा कमी झाली आहे. असे असले तरी दागिने आणि गुंतवणुकीबाबत भारताने गेल्या वर्षांत घसरण नोंदविली आहे. देशाची सोन्याच्या दागिन्यांची मागणी २०१४ मध्ये ८ टक्क्यांनी उंचावत ६६२.१० टन राहिली आहे, तर गुंतवणुकीसाठीच्या सोन्याची मागणी गेल्या वर्षांत ५० टक्क्यांनी कमी होत ती १८०.६० टन नोंदली गेली आहे. मूल्य तुलनेतही सोने मागणी ५३ टक्क्यांनी कमी होऊन २०१४ मध्ये ४४,८४७.१० कोटी रुपये झाली आहे.
भारताचे सोन्याच्या पुनर्वापराचे प्रमाणही गेल्या वर्षांत २३.५ टक्क्यांनी कमी झाले आहे. मौल्यवान धातूचे दर २०१४ मध्ये कमी राहिले असले तरी सोन्यावरील र्निबधांमुळे छुप्या पद्धतीने सोन्याचे आयात व्यवहार या कालावधीत १७५ टनाइतके झाले असावेत, असे जागतिक सुवर्ण परिषदेच्या भारत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम यांनी म्हटले आहे.
जागतिक स्तरावरही सोन्याची मागणी २०१४ मध्ये चार टक्क्यांनी रोडावत ३,९२४ टन झाली आहे.