10 April 2020

News Flash

‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूकस्वारस्य

डिसेंबर २०१९ गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक अवघी २७ कोटी रुपये होती.

जानेवारीतील निधी ओघाचा सात वर्षांचा विक्रम

मुंबई : म्युच्युअल फंड उद्योगातील जागतिक स्तरावर पसंतीच्या ठरलेल्या गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) पर्यायाला वर्षांरंभीच भारतीय गुंतवणूकदारांचा ओढा पुन्हा वाढला असून, लक्षणीय गुंतवणूक प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारी २०२० मध्ये गोल्ड ईटीएफमधील निधी ओघ २०० कोटी रुपयांचा राहिला आहे. गेल्या सात वर्षांतील ही या प्रकारच्या फंडात गुंतविली गेलेली सर्वाधिक मासिक रक्कम आहे.

मौल्यवान धातूच्या अस्थिर दरानंतरही अनिश्चिततेच्या स्थितीत सुरक्षितता पाहून ‘गोल्ड ईटीएफ’ पर्यायाला गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याचे यावरून लक्षात येते. यंदा सलग तिसऱ्या महिन्यात गोल्ड ईटीएफमधील निधी ओघ वाढता राहिला आहे. डिसेंबर २०१९ गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक अवघी २७ कोटी रुपये होती. तर तत्पूर्वी, नोव्हेंबरमध्ये ७.६८ कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये ४४ कोटी रुपये व ऑगस्टमध्ये १४५ कोटी रुपये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मात्र त्यातून ३१.४५ कोटी रुपये काढून घेतले होते.

देशातील ४० हून अधिक म्युच्युअल फंड उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’ संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर, यंदाच्या जानेवारीत गोल्ड ईटीएफमध्ये नोंदला गेलेला उल्लेखनीय निधी ओघ हा डिसेंबर २०१२ नंतरचा सर्वोत्तम ठरला आहे. सात वर्षांपूर्वी गोल्ड ईटीएफमध्ये ४७४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

गोल्ड ईटीएफद्वारे होणाऱ्या मालमत्ता व्यवस्थापनाची रक्कम जानेवारी २०२० अखेर ६,२०७ कोटी रुपये झाली असून त्यात मासिक तुलनेत ७.६ टक्के वाढ नोंदली गेली आहे. डिसेंबर २०१९ अखेर ही रक्कम ५,७६८ कोटी रुपये होती. म्युच्युअल फंड गंगाजळी जानेवारी २०२० मध्ये विक्रमी अशा २७.८५ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ‘अ‍ॅम्फी’ने सोमवारीच जाहीर केले होते. मासिक तुलनेत त्यात १.२० लाख कोटी रुपयांची भर पडली.

विविध देशांमध्ये भू-राजकीय तणावाची स्थिती आणि जागितक आर्थिक मंदीसदृश वातावरणामुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित शाश्वत पर्यायाकडे वळला असल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते. – हिमांशू श्रीवास्तव, वरिष्ठ संशोधक विश्लेषक, मॉर्निगस्टार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 12:40 am

Web Title: gold etf investment interest akp 94
Next Stories
1 निर्देशांकांच्या सलग दोन सत्रांतील घसरणीला खंड
2 वर्षांरंभीही वाहन विक्रीत घसरणच; जानेवारी २०२० मध्ये ६.२ टक्के घट
3 सप्ताहारंभीही घसरण
Just Now!
X