ढासळते भारतीय चलन जसे भांडवली बाजाराच्या घसरणीला निमित्त ठरले तसे सराफा बाजारातील दर शुक्रवारी चांगलेच चकाकले. ऐन सण-समारंभाच्या तोंडावर सोन्याने तोळ्यासाठी ३० हजाराच्या पुढे तर चांदीने किलोमागे ५० हजाराच्या नजीक जाणे पसंत केले आहे. सोन्याचे भाव चार महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा ३० हजार रुपयांपुढे गेले आहेत. मौल्यवान धातूवरील आयात शुल्क चालू आठवडय़ात वाढविल्यानंतरही डॉलरच्या तुलनेत रुपया सावरत नसल्याचे पाहून सरकारमार्फत सोने-चांदीवर अधिक बंधने येण्याच्या शक्यतेने व्यापाऱ्यांच्या एकाच दिवसातील वाढलेल्या व्यवहारामुळे धातूंचे दर गगनाला भिडल्याचे मानले जात आहे. त्यातच आगामी कालावधीही सण-समारंभाचा असल्याने धातूंचा साठा करून ठेवण्याचा प्रयत्न मोठय़ा खरेदीदारांकडून होत असल्याचे म्हटले जाते. देशाच्या आर्थिक राजधानीत सोने तोळ्यामागे शुक्रवारी एकदम १,१७५ रुपयांनी वाढून ३० हजाराच्या पुढे, ३०,६९७ रुपयांवर गेले. स्टॅण्डर्ड सोन्याचा हा दर होता तर याच वजनासाठी शुद्ध सोनेदेखील ३०,८३० रुपयांपर्यंत गेले होते. चांदीच्या दरातही एकाच दिवसातील व्यवहारात जवळपास ३ हजार रुपयांची (रु.२,९७०) वाढ नोंदली गेल्याने पांढरा धातूदेखील किलोमागे ५० हजार रुपयांपर्यंत (रु.४९,९८०) जाऊन धडकला. चालू खात्यातील तूट सावरण्यासाठी सोने-चांदीवर जानेवारीपासून सतत वाढविण्यात येत असलेल्या आयात शुल्काचा काहीएक परिणाम झाला नसल्याची आकडेवारी ‘जागतिक सुवर्ण परिषदे’ने काल जाहीर केली आहे.